पारनेर भाजप कार्यालयात युवा मोर्चाचा कार्यकर्ता मेळावा, पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वितरण
पारनेर | नगर सह्याद्री
भाजप ही तरुणांना संधी देणारी आणि नेतृत्व घडवणारी संघटना आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर आहे. समाजकारण आणि राष्ट्रकार्यात युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवत संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केले.
पारनेर येथील भाजपच्या मुख्य कार्यालयात भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याला भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी संघटनात्मक कामकाज आणि पक्ष विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने निलेश शेळके आणि राहुल नरड यांची युवा मोर्चा मंडल उपाध्यक्षपदी, तर मंगेश खोसे यांची युवा मोर्चा मंडल चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पारनेर तालुक्यातील युवकांना विविध शासकीय योजना आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. मेळाव्यात पारनेर तालुक्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, आगामी संघटनात्मक निवडणुका आणि पक्ष विस्ताराच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ, उद्योजक सुरेश पठारे, अश्विनीताई थोरात, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, नगरसेवक युवराज पठारे, भाजप नेते सुनील थोरात, दूध संघ अध्यक्ष दत्तानाना पवार, युवा मोर्चा उपाध्यक्ष पंकज कारखिले, सुभाष दुधाडे, कल्याण थोरात, लहू भालेकर, सोनाली आंबेकर, अतुल माने, अर्जुनराव नवले, जयदीप सालके पाटील, संग्राम पावडे, प्रमोद कावरे, कानिफनाथ ठुबे निवृत्ती वरखडे, मनोज मुंगसे, आनंद गांधी यांच्यासह पदाधिकारी व शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा, प्रेरणा
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे युवा वर्गासाठी प्रेरणादायी नेतृत्व आहे. पारनेर येथे त्यांनी युवकांना केलेले मार्गदर्शन पक्ष संघटनेला निश्चितच नवी दिशा आणि बळ देणारे ठरेल. त्यांच्या विचारांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि समाजकार्यासाठीची प्रेरणा निर्माण झाली असून, आगामी काळात युवक अधिक जोमाने पक्षविस्तारासाठी काम करतील.
– नगरसेवक युवराज पठारे










