नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने छेडलेले आंदोलन तीव्र झाले असून, अनेक आंदोलक संसद भवन परिसरात दाखल झाले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्च केला जात आहे. तसेच, गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुरांचा वापर केला जात आहे. संसदेच्या सुरक्षेच्या कारणास्तव संसदेची प्रवेशद्वार बंद करण्यात आली आहेत. शिवाय खबरदारी म्हणून अग्निशामक दलाचे जवान, सुरक्षा दलाचे जवान संसदेत परिसरात तैनात करण्यात आले आहेत. संसद भवनाच्या बाहेर देखील मोठा पोलिस बंदोबस्त आणि बॅरिकेड्स तैनात करण्यात आले आहेत. आंदोलन तीव्र झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संसदेतून बाहेर पडले आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन तीव्र
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज चलो संसद मोर्चाचे आजोयन केले होते. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने देशभरातून तरुण दिल्लीत दाखल झाले आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली शिवाय जमावबंदीचा आदेश लागू करत जंतर मंतर आणि संसद भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पण, पोलिस बंदोबस्ताला न जुमानता आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मार्च सुरु केला.

संसद भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त
मोठ्या संख्येने आंदोलक या मोर्चात सामिल झाले व त्यांनी संसदेच्या दिशेने मार्च करताच पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्च आणि अश्रूधुरांचा वापर केला. मोर्चात सामिल झालेल्या आंदोलकांची संख्या वाढताच पोलिसांनी ठिकठिकाणी बेरिकेट्स आणि पोलिस बंदोबस्त तैनात केला. संसद भवन परिसरात देखील मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही आंदोलक संसद भवनाच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतर याठिकाणी देखील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. भवन परिसरात लोखंडी बॅरिकेट्स, अग्निशामक दलाचे जवान आणि सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. याप्रकरणीचे व्हिडीओ संसद भवन परिसरातून समोर आले आहेत.
पंतप्रधान संसद भवनातून पडले बाहेर
आंदोलन तीव्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या ताफ्यासह संसद भवनातून बाहेर पडल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. पीटीआयने याबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. आंदोलकांच्या वाढत्या संख्येनंतर संसद परिसर आणि जंतर मंतर परिसरात छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर
जंतर मंतरवर आणि त्यानतंर संसदेच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, तसेच, अश्रूधुरांचा देखील वापर करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये काही आंदोलक जखमी झाले असून, याचे व्हिडीओ देखील समोर आले आहे. अभिजीत दिपके यांच्यासह सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. वांगचुक यांनी या मोर्चात सहभागी होण्यासाठी रुग्णालयाकडे मागणी केली आहे. यासह आम आदमी पक्षाचे नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन
आजपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. दरम्यान, अधिवेशन सुरु होताच विरोधकांनी नीटपेपरफुटी आणि राम मंदिर देणगी चोरीवरुन सभागृहात गोंधळ घातला. यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिवेशन स्थगित केले. लोकसभा पाचवेळा तर राज्यसभेचे कामकाज चारवेळा स्थगित करण्यात आले. दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांच्या ५६ वर्षीय तरुण म्हणत टीका केली. दुसरीकडे आंदोलकांवर होणाऱ्या लाठीचार्जचा मल्लिकार्जुन खरगे यांनी निषेध करत, लाठीचार्ज योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉक्रोच जनता पार्टी आणि जे. पी. नड्डा यांची भेट
आंदोलकांनी जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली असून, दहा मिनिटांच्या चर्चेत नड्डांना कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्यांचे पत्र दिले, अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. आंदोलकांकडून प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, ऐन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन संसदेवर धडकल्याने सरकारची कोंडी झाली आहे.
इंटरनेट ठप्प, मेट्रो स्टेशन बंद
या आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनाने दिल्लीत कडक पावले उचलली आहेत. जंतरमंतर आणि संसदेच्या परिसरातील सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक मेट्रो स्टेशन्स प्रवाशांसाठी बंद करण्यात आली आहेत. तसेच, आंदोलक आणि नागरिकांमध्ये समन्वय होऊ नये यासाठी संपूर्ण परिसरात मोबाईल जॅमर्स बसवून इंटरनेट सेवा देखील ठप्प करण्यात आली आहे.
‘माझी प्रकृती उत्तम, संसदेवरील मोर्चात जाऊ द्या’; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र
“माझं आरोग्य पूर्णपणे व्यवस्थित असून सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य आहेत. त्यामुळे मला किमान तात्पुरती तरी रुग्णालयातून सुट्टी द्यावी, जेणेकरून मला संसदेवर निघणाऱ्या मोर्चात सहभागी होता येईल,” अशी विनंती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे. त्यांनी स्वतः पत्र लिहून ते रुग्णालय प्रशासनाला सोपवलं आहे. “माझी प्रकृती उत्तम आहे. पोलिसांनी मला ताब्यात घेतलेले नाही, असा दावा केला जात आहे. जर मला स्थानबद्ध केलेले नाही, तर मग माझ्या हालचालींवर निर्बंध कशासाठी लादले जात आहेत?” असा परखड सवाल त्यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून केला आहे.
रुग्णालयाचा मेडिकल रिपोर्ट काय सांगतो?
दुसरीकडे, सफदरजंग रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, वांगचुक यांच्या शरीराचे महत्त्वाचे घटक स्थिर आहेत. मात्र, रक्ताच्या चाचण्यांच्या अहवालानुसार त्यांना अजूनही डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवणे गरजेचे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
वांगचुक यांच्या पत्नीची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
सोनम वांगचुक यांच्या रुग्णालयातील मुक्कामावरून आता मोठा वाद पेटला आहे. वांगचुक यांची पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “माझ्या पतीला एका प्रकारे पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. कुटुंबातील सदस्यांनाही त्यांना भेटू दिले जात नाही.” गीतांजली यांनी या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोणतीही अधिकृत अटक न करता वांगचुक यांना रुग्णालयात डांबून ठेवले जात असून, त्यांच्या उपचाराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कुटुंब आणि स्वतः वांगचुक यांच्याकडून हिरावून घेतला गेला आहे, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या – गीतांजली वांगचुक
नीट यूजी परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्यावरुन कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आज संसदेवर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला देशभरातील युवकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचूक यांनी आजच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. केंद्र सरकारनं भारताच्या शिक्षण व्यवस्थेला जगात सर्वोत्तम करण्यासाठी जबाबदारी पाळू न शकणाऱ्यांच्या राजीनाम्यापासून सुरुवात करावी, अशी मागणी गीतांजली वांगचुक यांनी केली आहे. दिल्लीत इंटरनेट बंद करण्यात आलेलं आहे. हे सरकार देशाल विश्वगुरु बनवू शकत नाही, असं गीतांजली वांगचुक म्हणाल्या, माझा कोणत्याही सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही, मला म्हणून सोनम वांगचूक यांना दुसऱ्या रुग्णालयात न्यायचं आहे, अशी भूमिका गीतांजली वांगचुक म्हणाल्या.
राजीनाम्यापासून सुरुवात करा
आमचा लढा भ्रष्ट सरकारी व्यवस्थेविरोधात आहे, हे सरकार लोकांच्या हिताचे नाही,आमच्या मागण्या त्याच आहेत. शिक्षण हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचा विषय असला पाहिजे. भारताची शिक्षण व्यवस्था जगात सर्वोत्तम होण्यासाठी ठोस पावलं उचलली जावीत. त्याची सुरुवात जे त्यांची जबाबदारी योग्यपणे पाळू शकले नाहीत, त्यांच्या राजीनाम्यापासून सुरुवात केली पाहिजे, अशी मागणी गीतांजली वांगचुक यांनी केली आहे. आम्ही देशाच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि देशासाठी उभे राहिले आहोत. सोनम वांगचुक भारतासाठी उभे आहेत. आम्ही युवकांसाठी त्यांच्या भविष्यासाठी उभे आहोत, असं गीतांजली वांगचुक यांनी म्हटलं आहे.
सौरभ दास काय म्हणाले?
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी संसद भवनावरील मोर्चा सुरु असल्याचं सांगितलं. शांततेच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जातंय, असं सौरभ दास यांनी म्हटलं. जंतरमंतर ते संसद भवन असा मोर्चा सीजेपीकडून 20 जुलै म्हणजे आज काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार सीजेपीच्या मोर्चात देशभरातील युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आंदोलक संसद भवनाच्या गेटपर्यंत पोहोचले होते. मात्र, सुरक्षा दलांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव वाढलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
कॉक्रोच-वॉक्रोचचं आंदोलन मोदी आणि फडणवीसांना बदनाम करण्यासाठी रचलेली नौटंकी – मंत्री बावनकुळे
जंतरमंतरवरील आंदोलनावर आणि विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागण्यांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “कॉक्रोच-वॉक्रोचचं हे आंदोलन म्हणजे म्हणजे मोदी आणि फडणवीसांना बदनाम करण्यासाठी रचलेली नौटंकी आहे,” असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. “सध्या जे आंदोलन सुरू आहे, ती निव्वळ नौटंकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठीच हा सगळा बनाव रचला जात आहे. काही तरुण केवळ मनस्तापामुळे यात सहभागी होत आहेत. पण मला सांगा, हा पेपर काय बावनकुळे किंवा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फोडला आहे का? तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या असतील तर नक्की सुचवा, पण थेट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हे निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे.” मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
“इंग्रजांनाही लाजवणारं हे क्रूर आणि निष्ठूर सरकार”; आंदोलकांवर लाठीचार्ज होताच संतापले रोहित पवार
रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही अशाच प्रकारे इंग्रजांकडून लाठीचार्ज केला जात होता… इंग्रजांनाही लाजवणारं हे क्रूर आणि निष्ठूर सरकार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या हुकूमशाही सरकारचा तीव्र निषेध!” पुढे ते म्हणाले, “दिल्लीमध्ये संसदेवर निघालेला विराट मोर्चा सर्वार्थाने चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. मात्र लोकशाहीमध्ये सर्वात शक्तिशाली रस्त्यावर उतरलेला सर्वसामान्य माणूस असतो हे आज सरकारच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. २० दिवस अन्नत्याग करून देखील शासनाने या आंदोलनाची दखल तर घेतली नाहीच मात्र सोनम वांगचूक यांना हुकुमशाही पद्धतीने उचलण्यात आले. आपली चूक सरकार मान्य करत नाहीच मात्र उलट लोकशाही पद्धतीने आंदोलन देखील करून दिले जात नाही. सरकारने आता तरी शहाणं व्हावं आणि अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, नाहीतर हे आंदोलनच त्यांच्या शेवटाची सुरवात असेल आणि हे सरकार असंच वागत राहिलं तर केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेवर असलेल्या या सरकारला देशभरातील तरुण सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.
“मुलांवर लाठीचार्ज केला…सरकार त्यांना मारण्याचा प्रयत्न करतंय…” ; मल्लिकार्जुन खर्गे यांचा राज्यसभेत गंभीर आरोप
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत सीजेपीच्या आंदोलनाचा मुद्दा गाजला. सोमवारी राज्यसभेत बोलताना, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी, “हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, पण सरकार तो दडपण्याचा प्रयत्न करत आहे” असा गंभीर आरोप केला. राज्यसभेत नीट विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. याविषयी बोलताना त्यांनी, “हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. मी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल बोलत आहे. आज हजारो विद्यार्थी जंतर मंतरवर आले होते आणि तिथे लाठीचार्ज झाला. सरकार त्यांना मारण्याचा, दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार त्यांना चिरडून तिथून हटवण्याचा प्रयत्न करत आहे.”असे म्हटले. डिंपल यादव यांच्या नेतृत्वाखाली सपा खासदारांनी सीजेपी आणि नीट विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडण्यासाठी संसदेपासून जंतर मंतरपर्यंत मोर्चा काढला. प्रसारमाध्यमांशी बोलताना डिंपल यादव म्हणाल्या की, देशभरात परिस्थिती अशी आहे की तरुणांना आपल्या समस्या मांडायच्या आहेत, पण सरकार त्यांचे ऐकून घेण्यास किंवा संवाद साधण्यास तयार नाही.
“धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा”
समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन यांनीही या मोर्चात सहभाग घेतला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. सरकारने नैतिकतेच्या आधारावर जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी उभे आहोत; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. संभळचे सपा खासदार झिया-उर-रहमान म्हणाले की, विद्यार्थी आणि तरुण हे देशाचे भविष्य आहेत, परंतु त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. सपाचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाणार आहे. आम्ही त्यांच्या मोहिमेला पाठिंबा देतो. सोनम वांगचुक यांना जंतर मंतरमधून जबरदस्तीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी समाजवादी पक्षाची मागणी आहे.
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत. बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेलं आहे. अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सीजेपीच्या आंदोलनावर टीका केली होती. अशातच या टीकेला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या कि, ‘अरे मोदीजींच्या चमच्या, पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय? देशातील कोट्यावधी जनतेने देशाला देशोधडीला लावण्यासाठी सत्ता नव्हती दिली. जी जनता तुम्हाला डोक्यावर उचलून घेऊ शकते ती जनता तुम्हाला उचलून आपटूही शकते. देशातील जनतेला विशेषतः तरुणांना गृहीत धरू नका. अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी प्रहार केला आहे.
‘CJPवाल्यांनो, हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा’; आंदोलनकर्त्यांना कंगना रणौत यांचे थेट आव्हान
भाजपच्या लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी संसदेतील गोंधळ आणि CJP आंदोलनावर कठोर प्रतिक्रिया देत आंदोलनकर्त्यांना थेट निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘CJPवाल्यांनो, तुमच्यात जर हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा. लोकशाहीमध्ये सरकार कसे चालवायचे, याचा निर्णय जनतेने निवडून दिलेल्या सरकारचाच असतो. आंदोलन करून किंवा दबाव आणून सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडणे योग्य नाही,’ असे कंगना रणौत म्हणाल्या. संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षेतील गैरव्यवहार आणि राम मंदिर देणगी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज काही काळासाठी थांबवावे करावे लागले. यावर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाल्या की, संसद ही चर्चा आणि उत्तरदायित्वासाठी आहे, गोंधळ घालण्यासाठी नाही. संसदीय अधिवेशनाचा उद्देश प्रत्येक विषयावर सखोल चर्चा करणे आणि सरकारला उत्तरदायी धरणे हा आहे. विरोधकांनी त्यांचे प्रश्न सभागृहात मांडावेत, याला आमचा विरोध नाही. मात्र, सतत घोषणाबाजी करून कामकाज ठप्प करणे ही लोकशाहीसाठी योग्य पद्धत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं
देशातील शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आता अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. जंतरमंतर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली असून, ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आग्रहास्तव आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. उपोषण सोडताच दीपके यांनी विश्रांती न घेता थेट आंदोलकांसह संसदेच्या दिशेने कूच केलेल्या ‘संसद मार्च’चे नेतृत्व हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून सोनम वांगचुक यांना आरोग्याचे कारण देत जबरदस्तीने रुग्णालयात हलवले होते. पोलिसांच्या या कारवाईचा निषेध म्हणून अभिजित दीपके यांनी तात्काळ बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, “आंदोलनाची दिशा स्पष्ट असून समर्थकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आणि मुख्य ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे,” असे आवाहन वांगचुक यांनी रुग्णालयातून केले. त्यांच्या या शब्दांचा मान ठेवत दीपके यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा रस्त्यावरील लढाईत सक्रिय झाले. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि वाढत्या विद्यार्थी आक्रोशामुळे अखेर केंद्र सरकारवर दबाव वाढल्याचे चित्र आहे. CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी ‘X’ (ट्विटर) वर माहिती दिली की, केंद्र सरकारने स्वतःहून आंदोलकांशी संपर्क साधून त्यांना चर्चेचे आमंत्रण दिले आहे. त्यानुसार, सौरव दास आणि आशुतोष रांका हे CJP च्या वतीने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. “आमच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत आणि देशातील लाखो युवक आमच्यासोबत रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे सरकारला विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावाच लागेल,” असे सौरव दास यांनी ठामपणे सांगितले.










