जागावाटपाच्या चर्चेतून निर्णय होणार ः सभापती राम शिंदे
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यात भाजप नगरसेवकांची संख्या जास्त असून ज्याचे जास्त संख्याबळ, त्याचा उमेदवार या सूत्रानुसार नगर विधानपरिषदेची जागा भाजपला मिळण्यासाठेी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपकडे निष्ठावंतांची संख्या मोठी असून, निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी, यासाठी मी आग्रही आहे. मात्र, ऐनवेळस बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाऊ शकते, असे सांगत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सस्पेन्स वाढविला आहे.
पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र चोंडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सभापती शिंदे बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आदी उपस्थित होते.
सभापती शिंदे म्हणाले की, विधानपरिषदेची नगरची जागा यापूव राष्ट्रवादीकडे होती. सलग दोन टर्म स्व. अरुणकाका जगताप यांनी प्रतिनिधीत्व केले. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक नगरसेवक भाजपकडे आहे. महायुतीकडे बहुमत आहे. ज्याचे जास्त सदस्य, त्याला उमेदवारी या तत्वानुसार नगरच्या जागेवर भाजपचा अधिकार आहे. ही जागा यापूव राष्ट्रवादीकडे असली तरी आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेताताई पवार यांच्यात बैठक सुरू आहे. जागावाटपाची चर्चेची तिसरी फेरी असून, लवकरच याचा निर्णय जाहीर होणार आहे. भाजपकडे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, नगराध्यक्ष सत्यजित कदम व माजी खासदार सुजय विखे हे उमेदवार आहेत. भाजपमधील निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी, यासाठी मी आग्रही आहे.
मी निष्ठावंतासोबत असून, त्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हेच घेणार असल्याचे सांगितले.माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या संपर्कात नाही. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. मात्र, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तनपुरे यांनी उमेदवारी मागे घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व तनपुरे यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ठरविले तर तनपुरे यांना उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे वेगळा निर्णय होऊ शकतो, असे सांगत त्यांनी उमेदवारीचा सस्पेन्स वाढविला आहे.
जिल्हा बँकेत बारकाईने लक्ष घालणार
शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. सहकार कायद्यातील घटनादुरुस्तीने अनेकांचा पत्ता कट होणार असून, नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी बारकाईने लक्ष घालणार असल्याचे सांगत सभापती राम शिंदे यांनी एकप्रकारे पालकमंत्री विखे पाटील यांना इशारा दिला आहे.










