- जाहिरात -spot_img
breaking news

विवाहितेला जाच, हुंड्यासाठी छळ, भरदिवसा सोनसाखळी पळवली, चोरी, कुठे काय घडलं पहा…

पतीसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –

माहेरून पैसे आणण्यासाठी आणि पतीचे २० लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि नणंदांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सावेडी येथील पाईपलाईन रोड परिसरात राहणाऱ्या पीडित विवाहितेचा जानेवारी २०१३ पासून छळ सुरू होता. पती गणेश वर्मा आणि सासू यांनी घरखर्चासाठी व पतीवरील २० लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेकडे माहेरून ६ लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. विवाहितेने पैसे देण्यास नकार दिला असता, तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या छळात पती, सासू यांच्यासह पाच नणंदा आणि दोन आत्यांचाही समावेश आहे. नणंदांनी पतीला फोन करून विवाहितेबद्दल चुकीची माहिती देऊन तिला मारहाण करण्यास चिथावणी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

​पतीने दारूच्या नशेत विवाहितेला कामावर जाण्यासाठी सक्ती केली आणि “तुझा खर्च तूच कर, आम्ही तुला पैसे देणार नाही” अशी धमकी दिली. आरोपींनी तिला अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन एका भाड्याच्या खोलीत राहण्यास भाग पाडले. ५ एप्रिल रोजी पतीने विवाहितेसह तिच्या आईला आणि मुलांनाही बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने अखेर पोलिसांत तक्रार दिली. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी पती गणेश वर्मा, सासू मंगला वर्मा आणि इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी करत आहेत.

हुंड्यासाठी छळ करून अकरा लाखांची मागणी; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर – सासरी नांदत असताना विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून, घराच्या फर्निचरसाठी आणि हॉटेल व्यवसायासाठी अकरा लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचा विवाह झाल्यानंतर २०१७ ते २०२५ या कालावधीत सासरी नांदत असताना हा प्रकार घडला. आरोपींनी संगनमत करून विवाहितेला नेहमी शिवीगाळ व दमदाटी केली. घरामध्ये नवीन फर्निचर बनवण्यासाठी आणि हॉटेलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून अकरा लाख रुपये घेऊन येण्याची मागणी सासरच्या मंडळींनी लावून धरली होती. ही मागणी पूर्ण होत नसल्याने विवाहितेची उपासमार करून तिला क्रूरतेची वागणूक देण्यात आली.

हे सुद्धा वाचा :  बासरी लॉजिंग प्रकरणात फेरतपासाचे न्यायालयाचे आदेश, हलगर्जीपणावर ताशेरे

​पीडितेला आरोपींनी मारहाण करत घराबाहेर हाकलून दिले, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून पती, सासू, दीर, जाऊ, नणंद आणि नंदवा अशा एकूण सहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहर परिसरातील बाबावाडी भागात रस्ता ओलांडताना एका भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिलेच्या पायाला मोठी दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी किरण खाकाळ या आपल्या मुलासह ज्युपिटर दुचाकीवरून अमरधाम रस्त्याने जात होत्या. रिमांड होमसमोर त्या फोनवर बोलण्यासाठी थांबल्या असताना पाठीमागून येणाऱ्या अशोक लेलंड कंपनीच्या टेम्पोने (एम एच १६ ए वाय १२२२) त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मोहिनी खाकाळ रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
​अपघात केल्यानंतर टेम्पो चालक जखमी महिलेला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. जखमी महिलेने तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर पोलिसांत धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आता या फरार चालकाचा शोध घेत आहेत.

बुरुडगाव रोडवर भरदिवसा महिलेची सोनसाखळी हिसकावली; अडीच लाखांची मोहनमाळ लंपास
​अहिल्यानगर: शहरातील बुरुडगाव रोडवरील शिवाजी हाउसिंग सोसायटी परिसरात एका अज्ञात दुचाकीस्वाराने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ बळजबरीने हिसकावून नेली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा :  बनावट सह्यांच्या आधारे ८८ लाखांची फसवणूक; आक्षेपार्ह पोस्ट आता ग्रुप ऍडमिनला भोवणार, जुन्या वादातून राडा...

​बुरुडगाव रोडवरील केशर गुलाब मंगल कार्यालयासमोर सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी यांची आई घरासमोरील गल्लीत पायी फिरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने, ज्याने अंगात काळे जॅकेट आणि डोक्यावर हेल्मेट घातले होते, त्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील ५ तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ काही समजण्यापूर्वीच हिसकावून पळ काढला. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

​घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिर्यादी विवेक खाकाळ यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील आणि शीतल मुगडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे.

पिंपळगाव कौडा येथे झोपेत असलेल्या महिलेचे दागिने हिसकावले; चोरटे फरार
​अहिल्यानगर: नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे घरासमोर झोपलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव कौडा परिसरात फिर्यादी महिला आणि त्यांचे पती घरासमोर झोपलेले होते. ६ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटे त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि २० हजार रुपये किमतीचा ४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने ओढून नेला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

​या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार डावखर करत आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ