पुणे / नगर सह्याद्री :
पिंपरी- चिंचवडमध्ये ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथक आणि खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली असून या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, पाच मोबाईल फोन, सात लाख रुपयांचे घड्याळ तसेच अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार असा एकूण सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणात फिर्यादी यांचा भाऊ हा व्यापारी असून त्यांचे पाच अनोळखी व्यक्तींनी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून फिल्मीस्टाईल अपहरण केले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. अपहरण केल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना फोन करून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास अपहरण केलेल्या व्यापाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली तसेच मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपी अपहरण केलेल्या व्यक्तीला काळ्या स्विफ्ट कारमधून मध्य प्रदेशकडे घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले.
तपासाची सूत्रे वेगाने हलवत पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक आणि गुंडाविरोधी पथकाने संगमनेर पोलिसांच्या मदतीने संगमनेर टोल नाका येथे सापळा रचला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत त्यांना फिल्मी स्टाईलने पकडले आणि अपहरणाचा हा संपूर्ण कट उधळून लावला. या कारवाईत चंद्रशेखर दीपचंद गौड, दिलीप मोहनलाल सरोज, रिंकू अलगुराम सरोज, अनिल गिरधारीलाल सरोज, मुकेश कुमार राममुरत चमार आणि संतन सुरेश चव्हाण या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपींनी अपहरण केलेल्या व्यक्तीला संगमनेर येथील चंदनापुरी घाट परिसरात सोडून दिले होते. त्यानंतर गुंडा विरोधी पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेत त्यांची सुखरूप सुटका केली. या अपहरण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संतन सुरेश चव्हाण असल्याचे तपासात समोर आले आहे. संतन चव्हाण याचा मामा अपहरण झालेल्या व्यापाऱ्याकडे काम करत होता. मात्र या प्रकरणात त्याच्या मामाचा काहीही सहभाग नसल्याचे सध्या तरी पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.










