अण्णा हजारेंच्या तालुक्याशी निगडीत प्रांत कार्यालय भ्रष्टाचाराने बरबटलेले | चिंचकर म्हणतो, वरिष्ठांना वाटा द्यावा लागतो!
सारिपाट / शिवाजी शिर्के
राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईची जवळपास दीड कोटी रुपयांची रक्कम मंजूर करून देण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे पुराव्यानिशी समोर आले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या तालुक्याशी निगडीत प्रांत कार्यालय असणाऱ्या श्रीगोंदा- पारनेर उपविभागीय कार्यालयात हा प्रकार घडला. साधा क्लार्क असणारा व्यक्ती सव्वा लाखाची लाच स्वत:साठी मागू शकत नाही. त्याने त्याच्या वरिष्ठांच्या सांगण्यावरुनच ही लाचेची मागणी केली. श्रीकुमार चिंचकर हे येथे प्रांताधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी आहेत. त्यांच्या खाबुगिरीच्या अनेक खमंग चर्चा आता झडू लागल्या आहेत. ‘मी पैसे घेतो, त्याचा वाटा वरिष्ठांना द्यावा लागतो’, असे ठणकावून चारचौघात चिंचकर बोलत असल्याच्या तक्रारी यापूवच काही स्वयंसेवी संस्थांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. चिंचकर याच्यावर या तक्रारींच्या अनुषंगाने काहीच कारवाई न होणे आणि उलट त्याच्याच कार्यालयात सव्वा लाखाची लाच मागितल्याप्रकरणी महसूल सहायक आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होणे, गुन्हा दाखल झालेला कंत्राटी कर्मचारी पसार होणे या घटनाक्रमात प्रांताधिकारी असणारे श्रीकुमार चिंचकर यांच्या इशाऱ्यावरच हे सारे झाल्याचे स्पष्टपणे समोर आले असल्याने श्रीकुमार चिंचकर या प्रकरणात आरोपी का नाही असा थेट सवाल उपस्थित होत आहे. आरोपीच्या पिंजऱ्यातील महसूल सहाय्यक ढुमणे आणि कंत्राटी कर्मचारी यांचे व प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासल्यास चिंचकर याचे कारनामे समोर आल्याशिवाय राहणार नाही.
राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम मंजूर करून देण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्याविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल सहाय्यक मंगेश विजय ढुमणे (सध्या नेमणूक जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर) आणि कंत्राटी कर्मचारी अमोल कानिफनाथ खामकर (उपविभागीय अधिकारी कार्यालय, श्रीगोंदा- पारनेर विभाग) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची मौजे जंगलेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील 143 गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डी वरील रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पासाठी शासनाने संपादित केली होती. या भूसंपादनाच्या बदल्यात तक्रारदारांना अतिम व पुरवणी अवॉर्डनुसार सुमारे 1 कोटी 47 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली होती. मात्र, या रकमेतील प्रलंबित निधी मिळण्यासाठी आवश्यक असलेली एफ.टी.ओ. (फंड ट्रान्स्फर ऑर्डर) मंजूर करून देण्याच्या प्रक्रियेत संशयित आरोपींनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
वरिष्ठ म्हणजेच श्रीकुमार चिंचकर, त्यांच्यासाठीच घेतले सव्वा लाख!
आरोपींनी तक्रारदाराशी संपर्क साधताना तुम्ही 1 लाख 20 हजार रुपये दिल्यास एफ.टी.ओ. म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर तात्काळ मिळेल आणि मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पैसे द्यावे लागतील, असे संशयिताने सांगितल्याचे तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत स्पष्ट नमूद केले आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी पडताळणी कारवाई केली. याचाच अर्थ आता लाच घेणाऱ्यांकडून त्याचे वरिष्ठ कोण हे समोर येणार आहे. लाच घेणाऱ्यांचे वरिष्ठ दुसरे तिसरे कोणी नसून प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर हेच असल्याचे लपून राहिलेले नाही.
महसूलमंत्र्यांचे नाव घेऊन वसुलीचा फंडा!
प्रांताची पोस्टींग मिळविण्यासाठी पैेसे मोजलेत अन् त्यातून मी येथे आलोय. महसूलमंत्र्यांपासून सारे माझ्या खिशात असल्याच्या गमच्या गप्पा श्रीकुमार चिंचकर भर चौकात मारत असल्याची चर्चा आहे. त्याच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आणि खाबुगिरीच्या अनेक तक्रारी असतानाही त्याच्यावर कारवाई होताना दिसत नसल्याने चिंचकरच्या दाव्यात तथ्यच असल्याचे समोर येत आहे.
व्हॉट्स अँप कॉल देखील झाला पुरावा!
मोबदला देण्यासाठी आरोपी करण्यात आलेल्या दोघांनीही वेळोवेळी पैशांची मागणी केली होती. महसूल सहाय्यक मंगेश ढुमणे याने व्हॉट्सप कॉलव्दारे तक्रारदारांशी संपर्क साधून 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी केली. फोन अथवा मोबाईल क्रमांकावरुन मागणी न करता व्हॉटसअप कॉल केला गेला होता. हा कॉल रेकॉर्ड होणार नाही अशी आरोपींची धारणा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. हा कॉलच पुरावा म्हणून समोर आला आणि आरोपी जाळ्यात अडकले.
पालकमंत्री साहेब, चिंचकरचे काही तरी करा!
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांना देखील चिंचकर याच्या आडमुठे आणि खाबुगिरीचे अनुभव आले आहेत. विखे पाटलांच्या समर्थकांनी चिंचकर याच्या भ्रष्ट कारभाराच्या अनेक तक्रारी केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. क्लार्कच्या माध्यमातून हप्तेखोरी झाल्याचे स्पष्टपणे समोर आले असल्याने आता चिंचकर याच्या विरोधात काय कारवाई होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










