अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या मनमाड-नगर-दौंड डबल लाईन रेल्वे प्रकल्पाला मोठे यश मिळाले आहे. सारोळा ते विसापूर या 16.20 किलोमीटर अंतरावरील सहाव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी शनिवारी (दि.30) यशस्वीरीत्या पार पडली. या यशस्वी ट्रायलमुळे नगरच्या रेल्वे प्रवासाला आता सुपरफास्ट गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनमाड-नगर-दौंड रेल्वेमार्गावरील दुहेरीकरणाचे तब्बल 236.610 किलोमीटरचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून, या प्रकल्पामुळे नगर जिल्ह्याच्या रेल्वे वाहतुकीत ऐतिहासिक बदल घडणार आहेत. अनेक वर्षांपासून सिंगल लाईनमुळे रेल्वेगाड्यांना क्रॉसिंगसाठी दीर्घकाळ थांबावे लागत होते.
त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात होता. मात्र आता दुहेरीकरणामुळे रेल्वे वाहतुकीचा वेग वाढणार असून, रेल्वे सेवा अधिक सुरक्षित, गतिमान आणि वेळेवर होणार आहे.गेल्या तीन वर्षांपासून नगर-दौंड द्रुतगती डबल लाईन रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. संपूर्ण मार्गाचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, सर्वत्र विद्युत इंजिनद्वारे रेल्वे सेवा सुरू करण्यावर भर दिला आहे. भविष्यात या मार्गावर रेल्वेगाड्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावू शकतील, अशी क्षमता विकसित करण्यात आली आहे.शनिवारी झालेल्या हायस्पीड चाचणीत ट्रॅकची गुणवत्ता, रेल्वेचा वेग, सिग्नल यंत्रणा आणि सुरक्षिततेची काटेकोर तपासणी करण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यामुळे नगर ते दौंड हा टप्पा लवकरच पूर्ण क्षमतेने रेल्वे वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती उपमुख्य अभियंता (बांधकाम) सागर चौधरी यांनी दिली.
रेल्वेमार्गाच्या चाचणीवेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त गुरू प्रकाश, मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेशकुमार गुप्ता, मुख्य अभियंता बी. के. सिंह, उपमुख्य अभियंता सागर चौधरी, सहाय्यक कार्यकारी अभियंता राजनारायण सैनी, अजय सिंह, धर्मेंद्र कुमार, सिनियर सेक्शन इंजिनिअर आर. डी. सिंह, अजय राणा, एस. के. सिंह, सुद्धांसू कुमार, प्रगती पटेल, परशुराम राठोड, धम्मरत्न संसारे, रामजी कुमार, प्रशांत कुमार आदी अधिकारी उपस्थित होते. सारोळा ते विसापूर डबल लाईन द्रुतगती रेल्वेमार्गाच्या सहाव्या टप्प्याची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. या प्रकल्पामुळे नगर जिल्ह्याच्या रेल्वे सेवेत मोठा बदल होणार असून प्रवाशांना भविष्यात अधिक वेगवान आणि वेळेवर सेवा मिळणार आहे.
रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार
मनमाड-नगर-दौंड रेल्वेमार्ग हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार असून विलंब कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांसह उद्योग, व्यापार आणि मालवाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे.याशिवाय भविष्यात या मार्गावर नवीन सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्याचाही मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे.










