सहायक निबंधकांची प्रशासक म्हणून नियुक्ती
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यात सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे १७ जणांचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले आहे. या बँकेवर प्रशासक म्हणून पारनेरचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) विकास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
बँकेच्या कारभारात झालेल्या मोठ्या आर्थिक अनियमिततेमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि काही संचालकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांना हारताळ फासत तब्बल ४ कोटी ३ लाख ५७ हजार ९४९ रुपयांचे नियमबाह्य कर्जवाटप केले होते. या गंभीर प्रकरणाची विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी सखोल चौकशी केली होती. या चौकशीअंती पारनेर पोलीस ठाण्यात संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, उपाध्यक्ष जयसिंग मापारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांच्यासह इतर संचालक आणि काही कर्जदारांचा समावेश आहे. प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विकास जाधव यांनी तातडीने कार्यालयीन अधीक्षक दीपक वाघमोडे यांच्यासह पारनेर येथील मुख्य कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला आहे. आता बँकेच्या पारनेर, कर्जत, श्रीगोंदे आणि जामखेड या सर्व शाखांचा कारभार प्रशासकांच्या नियंत्रणाखाली चालणार आहे. जाधव यांनी पदभार घेताच भारतीय रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याच्या नियमानुसार पुढील कामकाज पाहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील न्यायालयीन प्रक्रियेत उपाध्यक्ष जयसिंग मापारी, संचालक संजय तरटे आणि शिवाजी सुकाळे यांना जामीन मंजूर झाला आहे. बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांना काही अटी व शर्तींच्या अधीन राहून अंतरिम जामीन देण्यात आला आहे. सैनिक बँकेच्या या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण असले, तरी प्रशासकीय नियुक्तीमुळे आता बँकेच्या कारभारात पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये
सैनिक बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. बँकेचे कर्ज वितरण, ठेवी इतर आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. बँकेच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवीला नियमानुसार विमा संरक्षण सुद्धा आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये. – विकास जाधव, प्रशासक










