खून करून पुरावा नष्ट केल्याचा संशय, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पाथर्डी | नगर सह्याद्री
तालुयातील कासार पिंपळगाव येथे मुळा पाटबंधारे कालव्यामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत पाण्यात सापडल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीजवळील कालव्यामध्ये पांढर्या रंगाच्या गोणीत दोरीने बांधलेला मृतदेह दिसून आला. नागरिकांनी याबाबत तत्काळ पाथर्डी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.
मृतदेहाची स्थिती व तो ज्या प्रकारे गोणीत बांधून पाण्यात टाकण्यात आला आहे, त्यावरून संबंधित महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कालव्यामध्ये फेकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे अवघड झाले आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची सूत्रे वेगाने हलविण्यात आली आहेत.
पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून नागरिकांकडून माहिती गोळा करण्यात येत आहे. महिलेबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ पाथर्डी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले आहे.










