इतिहास जपत आधुनिक विकास; शहराच्या अर्थकारणाला मिळणार नवी चालना
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर शहर विकास कामातून वेगाने बदलत आहे. नेहरू मार्केटचा अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागत असून त्याला एक इतिहास आहे, तो टिकवून ठेवण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. जुन्या शहरांमध्ये आजही जुन्या पाऊलखुणा दिसतात. माझे आजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते, त्या काळात आम्ही नेहरू मार्केट जवळ मुरमुरे घेण्यासाठी येत असू. सुट्टीत येथे फिरायला यायचो.
चितळे रोड येथील नेहरू मार्केट परिसरात भव्य व्यापारी संकुल व भाजी मार्केट विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. या विकासकामामुळे शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेला आधुनिक स्वरूप मिळणार असून, पारंपरिक वारसा जपत नव्या युगातील सुविधा उपलब्ध होणार आहेत. चितळे रोड येथील नेहरू मार्केट परिसरात भव्य व्यापारी संकुल व भाजी मार्केट विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या विकासकामामुळे शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेला आधुनिक स्वरूप मिळणार असून, पारंपरिक वारसा जपत नव्या युगातील सुविधा उपलब्ध होणार आहेत.
आजच्या काळात फास्ट फूड, मॉल संस्कृती आणि ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. त्यापुढे आता एआय आले आहे. यामुळे भविष्यात बेरोजगारीचे संकट वाढण्याची शयता आहे आणि त्याचा परिणाम शहरांवर होणार आहे. त्यामुळे शहराची संस्कृती टिकवायची असेल तर पब्लिक पार्क उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात इमारती व सार्वजनिक सुविधा शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. शेतकर्यांसाठी सक्षम मार्केटउभे केले तर नागरिकांना ताजा भाजीपाला मिळेल. शहराची अर्थव्यवस्था शेतकर्यांवर अवलंबून आहे.
आमदार संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे पाटील शहर विकासासाठी पुढाकार घेत आहेत. शहराला चांगली टीम मिळाली असून सौंदर्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. आयुक्त यशवंत डांगे यांचे कामही समाधानकारक आहे.आमदार संग्राम जगताप म्हणाले की, अहिल्यानगर शहरामध्ये राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले हॉस्पिटलचे काम पूर्णत्वास आले असून खाजगी हॉस्पिटलला लाजवेल अशी इमारत उभी राहिली आहे. ही नगरकरांच्या मालकीची आहे. आता दुसरी मोठी इमारत नेहरू मार्केटच्या ठिकाणी उभी राहत आहे. येथे भाजी मार्केट व व्यापारी संकुल तयार होणार आहे. पूर्वीचा इतिहास जपण्यासाठी इमारतीवर घड्याळ बसवण्यात येणार असून ते नगरचे प्रतीक ठरेल. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मोठा निधी मिळाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनही लाभत आहे.
महापौर ज्योतिताई गाडे यांनी सांगितले की, नेहरू मार्केट चार मजली इमारतीच्या स्वरूपात उभारले जाणार आहे. ग्राउंड फ्लोअरवर ५३ भाजी ओटे आणि ५७ गाळे असतील. या प्रकल्पासाठी अंदाजे नऊ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त यशवंत डांगे यांनी केले तर उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी आभार मानले. या प्रकल्पामुळे नेहरू मार्केट परिसराला आधुनिक रूप मिळणार असून शहराच्या विकासासोबतच पारंपरिक बाजारपेठेचा इतिहास जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.










