स्वतःचे अपहरण झाल्याची खोटी माहिती
जामखेड | नगर सह्याद्री
डायल 112 या आपत्कालीन पोलिस सेवेवर स्वतःचे अपहरण झाल्याची खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या मद्यधुंद तरुणाविरुद्ध खर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तपासात संबंधित व्यक्ती मद्याच्या नशेत असल्याचे तसेच चेष्टेच्या उद्देशाने खोटा कॉल केल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी (दि. 8) सकाळी खर्डा पोलीस ठाण्याच्या डायल 112 पथकाची ड्युटी सुरू असताना सकाळी 11.44 वाजता आपत्कालीन क्रमांकावर कॉल प्राप्त झाला. ड्युटीवरील पोलीस अंमलदार आनंद धनवडे यांनी कॉल स्वीकारून माहिती घेतली असता, कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव दस्तगीर पापामियाँ कबीर (रा. वाकी, ता. जामखेड) असे सांगितले. त्याने आपले अपहरण झाल्याचे सांगून तातडीने पोलिस मदतीची मागणी केली. तसेच आपण जातेगाव फाट्याजवळ असल्याचेही त्याने सांगितले.
माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल बाळू खाडे आणि अशोक बडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोध घेऊन संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता तो मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान दस्तगीर कबीर याने दारूच्या नशेत चेष्टेच्या उद्देशाने अपहरण झाल्याचा खोटा कॉल केल्याची कबुली दिली.










