- जाहिरात -spot_img
breaking news

सायबर भामट्यांनी अभियंत्याला लुटले, दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणावर हल्ला, कुठे काय घडलं पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
चुकीच्या क्रमांकावर गेलेले ६०० रुपये परत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुण अभियंत्याला सायबर चोरट्यांनी तब्बल ४० हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, नालेगाव परिसरातील रहिवासी आदित्य संजय बेल्हेकर या तरुणाकडून पैसे पाठवताना मोबाईल क्रमांक चुकला होता. त्यामुळे त्याचे ६०० रुपये हरिलाल नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाले. हे पैसे परत मिळवण्यासाठी आदित्यने इंटरनेटवरून ‘एनपीसीआई’ कस्टमर केअरचा क्रमांक शोधला. चोरट्यांनी बनावट क्रमांकाद्वारे आदित्यशी संपर्क साधून त्याचा विश्वास संपादन केला.

​बँकेचा आयएफसी कोड आणि इतर तांत्रिक माहिती घेतल्यावर, चोरट्यांनी आदित्यच्या खात्यातून ३९,९८९ रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवले. ही रक्कम गया येथील नितीश कुमार नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आदित्यने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी संशयित आरोपीच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. नागरिकांनी अनोळखी क्रमांकावर आपली गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोतवाली पोलिसांचा छापा; गांजासह शाहरुख खान जेरबंद
​अहिल्यानगर: शहर उपविभागातील जुनी महानगरपालिका परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या शाहरुख ऊर्फ बबलु असिफ खान (वय ३५, रा. अहिल्यानगर) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडून १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार साबीर मोहम्मद अली शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नाशिक येथील अमली पदार्थ विरोधी कार्यदलाला जुनी महानगरपालिका परिसरात एक इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक प्रवीण पाटील आणि नाशिकच्या पथकाने दुपारी सव्वा बाराच्या सुमारास परिसरात सापळा रचला. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या शाहरुख खान याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत ४९६ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा उग्र वास असलेला गांजा मिळून आला.

हे सुद्धा वाचा :  टाकळी ढोकेश्वर आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करा ...

​नायब तहसीलदार गणेश भानवसे आणि पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपी शाहरुख खान याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दोन चिमुकल्यांना आमिष दाखवून छेडछाड, नराधमाला नागरिकांनी पकडले
​अहिल्यानगर: शहरातील आनंदीबाजार परिसरात दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेट आणि पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधमाला नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले. अमित सुभाष गवळी (वय २२, रा. विजयनगर, बोल्हेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश गाली यांची ७ वर्षांची मुलगी आणि त्यांच्या शेजाऱ्यांची ८ वर्षांची मुलगी सोमवारी सकाळी घरासमोर खेळत होत्या. यावेळी एका दुकानाच्या पायरीवर बसलेल्या अमित गवळी याने दोन्ही चिमुकल्यांना हाका मारून जवळ बोलावले. “मी तुम्हाला चॉकलेट आणि पैसे देतो,” असे आमिष दाखवून त्याने मुलींना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलींनी तातडीने घरात धाव घेऊन पालकांना हा प्रकार सांगितला.

​फिर्यादींनी बाहेर येऊन पाहिले असता आरोपी तेथेच बसलेला दिसला. त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादी आणि इतर नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याचे नाव निष्पन्न झाले. अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने हातवारे करून आमिष दाखवल्याप्रकरणी अमित गवळीविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस. सेदवाड करत आहेत. चिमुकल्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणावर शस्त्राने हल्ला
​अहिल्यानगर : शहरातील रामवाडी परिसरात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

​अकबर फकीर मोहम्मद सय्यद (वय ४३, रा. रामवाडी) हे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एसटी वर्कशॉप समोरील रस्त्याने आपल्या घराकडे जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या अजय विजय भोसले याने त्यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपीने अकबर यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या अजय भोसले याने त्यांच्या पाठीवर लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर आपल्या जवळील धारदार शस्त्राने अकबर यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले.

हे सुद्धा वाचा :  करमाळा-जामखेड महामार्गाचे भाग्य पालटणार! कारण काय

​भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, जाताना आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही दिली. जखमी अकबर यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील जबाबावरून तोफखाना पोलिसांनी आरोपी अजय भोसले विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

क्षुल्लक कारणावरून वृद्धाला बेदम मारहाण; तोफखाना भागातील घटना
​अहिल्यानगर: शहर परिसरातील तोफखाना येथील मोचीगल्ली भागात एका ५४ वर्षीय वृद्धाला विनाकारण शिवीगाळ करत लाकडी खोऱ्याच्या दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अनिकेत अशोक लव्हाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​सोमनाथ हिरालाल बिद्रे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बिद्रे हे आपल्या घड्याळ दुरुस्तीच्या टपरीसमोरील बाकड्यावर बसलेले असताना, आरोपी अनिकेत लव्हाळे त्या ठिकाणाहून जात होता. त्याने फिर्यादीकडे पाहून विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तू मला विनाकारण शिवीगाळ का करतो?” असे विचारल्याचा राग आल्याने आरोपीने घरातून लाकडी खोरे आणले आणि फिर्यादीवर धावून गेला.

​आरोपीने हातातील लाकडी दांडक्याने बिद्रे यांच्या मानेवर, पाठीवर, डाव्या हातावर आणि पायावर जोरात प्रहार करून त्यांना जखमी केले. “पुन्हा जर दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकीही आरोपीने यावेळी दिली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भांबळ करत आहेत.

जुनी तक्रार मागे घेण्यासाठी तरुणावर जीवघेणा हल्ला; मुकुंदनगरमधील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरातील झेंडीगेट परिसरातील कारी मशीद जवळ जुन्या वादातून एका तरुणावर आणि त्याच्या चुलत भावावर लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरशान रफिक सय्यद (वय २०, रा. बाबा बंगाली चौक) हा आपल्या चुलत भावासोबत घरी जात असताना ही घटना घडली. पूर्वी दिलेल्या एका तक्रारीची केस मागे घेण्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना वाटेत अडवले. यावेळी आरोपी जियान शेख याने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण करून जखमी केले. तसेच त्याच्यासोबत असलेल्या आयान शेख, हनिफ शेख आणि रेहान शेख यांनी फिर्यादी व त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी तुडवून जीवे मारण्याची धमकी दिली.

हे सुद्धा वाचा :  रुईछत्तीशीत दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, खिडकीचे गज कापून सव्वा लाख लांबवीले

​या घटनेनंतर जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारांनंतर अरशान सय्यद याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जियान शेख, आयान शेख, हनिफ शेख आणि रेहान शेख यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेनुसार मारहाण व धमकावल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संतोष बनकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ