अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेबाबत मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील पक्षाची कामगिरी समाधानकारक नसल्याची नाराजी व्यक्त करत त्यांनी शिवसेनेची संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. तसेच विद्यमान जिल्हाप्रमुख नितीन अवताडे यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून, नव्याने संघटन बांधणी होईपर्यंत तेच जिल्ह्यातील पक्षाचे कामकाज पाहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आले असताना संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीला माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बनकर, मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पक्षाची जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती, कार्यकर्त्यांमधील नाराजी, संघटनात्मक कमकुवतपणा आणि स्थानिक पातळीवरील निष्क्रियता यावर मंत्री सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक पकड कमकुवत होत असल्याचे पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आले होते. अनेक ठिकाणी पक्षाची हालचाल मंदावल्याचे तसेच स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर सामंत यांनी कठोर पाऊल उचलत संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. पक्ष अधिक सक्रिय, आक्रमक आणि संघटित करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी बैठकीत दिल्याचे समजते. आगामी काळात जिल्हाभर नव्याने संघटन उभारणी, बूथस्तरावर बांधणी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद यावर भर दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे, येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांपूर्वी शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आता थेट हस्तक्षेप सुरू केल्याचे चित्र आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेत मोठे राजकीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, कार्यकारणी बरखास्तीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिवसेना वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अनेक इच्छुक पदाधिकाऱ्यांनी नव्या जबाबदाऱ्यांसाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी काही दिवसांत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता असून, त्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेची नव्याने राजकीय मांडणी पाहायला मिळू शकते.










