शीवपाणंद संघर्षयोद्धा पुरस्काराने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा गौरव
सुपा | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याहस्ते राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रा व पदाधिकारी सन्मान अभियानाचा उत्साहात शुभारंभ झाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी शेतरस्त्यांमुळे ग्रामविकास होतो, हे राळेगणसिद्धीतून दाखवून दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर शरद पवळे यांच्या सामाजिक कार्यामुळे नारायणगव्हाण -राळेगणसिद्धी परिवाराचे नाते घट्ट झाल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत न्याय देण्याचे आश्वासन दिले.
राज्यभरातील शेतरस्त्यांच्या लढ्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघर्षयोद्ध्यांचा शिव पाणंद संघर्षयोद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही शिव पाणंद चळवळीच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले.
चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मा. अण्णा हजारे यांच्या पाठिंब्यामुळे शिव पाणंद शेतरस्ता चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे. ’मिशन झिरो पेंडन्सी’च्या माध्यमातून शेतरस्त्यांसाठी संघर्षे करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक गरजवंत शेतकऱ्याला हक्काचा, दर्जेदार आणि चिखलमुक्त सिमेंट काँक्रीटचा शेतरस्ता मिळवून देण्यासाठी ही चळवळ अधिक वेगाने पुढे नेली जाईल.यावेळी माझा रस्ता होवो न होवो, पण माझ्या शेवटच्या शेतकरी भावाला दर्जेदार शेतरस्ता मिळेपर्यंत मी थांबणार नाही, असे ठामपणे सांगत शरद पवळे यांनी चळवळीचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांसाठी निस्वार्थपणे संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गावोगावी जाऊन शेतरस्त्याच्या हक्काबाबत जनजागृती करण्याचा आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.जोरदार पाऊस सुरू असतानाही चळवळीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमसाठी अण्णा हजारे यांचे स्वीय सहायक दत्ता आवारी, रामदास सातकर, नाना आवारी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी चळवळीचे शरद पवळे, रविंद्र खुडे, नाथाभाऊ शिंदे, बाळासाहेब थोरात, सुरेश वाळके, विजय शेलार, सचिन शेळके, मनोहर मतकर, अंबादास आव्हाड, पोपट शेळके, शांताराम पानमंद, विठ्ठल निर्मळ, अशोक कचरे, शिवाजी राऊत, राहूल गट, युवराज कानसकर, विजय दळवी, नाना शिंदे, दशरथ वाळूंज, भाऊसाहेब वाळूंज, बबन दाभाडे, शिराज पठाण, दत्तात्रय बांगर, थोरवे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










