माजी सभापती राहुल झावरेंनी केला डॉ. सुजय विखेंचा सत्कार | विखे पाटलांशी पुन्हा वाढवली सलगी
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेरचे माजी आमदार नंदकुमार झावरे आणि त्यांचे चिरंजीव माजी सभापती राहुल झावरे यांनी निलेश लंके यांना आमदार करण्यात महत्वपूर्ण भूमिका वठवली होती. त्यानंतर झावरे पिता- पुत्रांपासून विखे पाटलांनीही फारकत घेतली होती. जिल्हा मराठा शिक्षण संस्थेतून झावरे यांच्या विरोधात विश्वस्तांनी जाहीर भूमिका घेतल्यानंतर विखे पाटलांनी त्यास मुक संमती दिल्याची चर्चाही झडली. गेल्या अनेक वर्षांपासून विखे पाटलांपासून दूर दिसणारे झावरे पिता- पुत्र पुन्हा एकदा विखे पाटलांशी जुळवून घेत असल्याचे स्पष्टपणे समोर आले असताना खासदार निलेश लंके यांच्यापासून या दोघांनीही फारकत घेतल्यात जमा आहे. माजी आमदार झावरे हे पालकमंत्री विखे पाटलांच्या अनेक कार्यक्रमांसह भाजपाच्या व्यासपीठावर दिसून आले असताना आता डॉ. सुजय विखे पाटलांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्याच्या निमित्ताने राहुल झावरे दिसून आले.
पारनेर तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे कायम वर्चस्व राहिले. त्यांना माननार्या कार्यकर्त्यांची एक फळी कायम दिसून आली. मात्र, यातील बहुतांश कार्यकर्ते हे विखे पाटलांच्या थेट संपर्कातील. निलेश लंके यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर विधानसभेची उमेदवारी करताच नंदकुमार झावरे यांनी लंके यांना पाठींबा देण्याची भूमिका घेतली. हे करताना त्यांनी विखे पाटलांवर थेट हल्लाबोलही केला होता. त्यानंतर झावरे – विखे पाटील यांच्यात कटुता निर्माण झाली.
विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांच्या विरोधात जाऊन निलेश लंके यांना आमदार करण्यात झावरे पिता- पुत्रांनी टोकाची भूमिका घेतली. आमदारकी पदरात पडल्यानंतर लंके हे राहुल झावरे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा विचार करतील असे वाटत असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही. पुढे लोकसभा निवडणुकीत लंके यांनी सुजय विखे पाटलांच्या विरोधात उमेदवारी केली. त्यावेळी झावरे पिता- पुत्र विखे पाटलांच्या प्रचारात सक्रिय राहतील असे वाटत असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही. जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी असणार्या नंदकुमार झावरे यांच्या विरोधात विश्वस्तांनी अविश्वास ठराव आणला आणि मंजूरही झाला.
त्या बंडाच्या पाठीमागे विखे पाटलांची ताकद होती अशी चर्चाही झडली. जिल्हा मराठातून बाहेर पडावे लागल्यानंतर झावरे पिता- पुत्र तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात अभावानेच दिसले. गेल्या वर्षभरापासून नंदकुमार झावरे हे विखे पाटलांच्या सोबत काही कार्यक्रमांमधून दिसले. याशिवाय भाजपाच्या पक्षीय बैठकांमध्येही दिसून आले. मात्र, राहुल झावरे हे कोठेच दिसून येत नव्हते.
भाजपाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नगरमध्ये पहिल्यांदाच विळद घाटात डॉ. सुजय विखे हे आले होते. त्यावेळी दक्षिणेतील अनेकांनी त्यांचा सत्कार केला. त्या सत्काराच्या कार्यक्रमात सर्वांचेच लक्ष वेधले ते राहुल झावरे यांच्या उपस्थितीने. राहुल झावरे यांनी सुजय विखे पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दोघांच्या स्मीतहास्य देखील झाले. राहुल झावरे हे समोर आलेले दिसताच सुजय विखे पाटलांनी मोठ्या मनाने त्यांचा सत्कार घेतला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल झावरे यांचे राजकीय पुनर्वसन होणार का आणि त्यासाठी सुजय विखे पाटील काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.










