निघोज | नगर सह्याद्री
अळकुटी येथील भाजप कार्यकर्त्यांना तेथील स्थानिक नेतृत्वावर विश्वास नाही म्हणून ते कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये आले. टीका करणाऱ्यांनी आपली उंची किती, आपण बोलतोय कोणावर, आपली लायकी आहे का? या सर्व गोष्टींचा विचार करून आमदार दाते यांच्यावर बोलायला हवे होते. या पुढच्या काळात आमदार दाते यांच्यावर चुकीचे आरोप केले तर आम्हीही त्याच पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रोहिदास लामखडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
अळकुटी भागातील कार्यकर्त्यांनी केलेल्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोप हे बिनबुडाचे आहे. त्यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला मात्र ती थुंकी त्यांच्या तोंडावर पडणार आहे. निश्चितपणे सहकारी पक्षांचा विधानसभा निवडणुकीत मदत झालेली आहे. मात्र स्वतः आमदार काशिनाथ दाते यांचे योगदान तालुक्याच्या राजकारणात तीस वर्षांचे आहे, हे कोणी विसरू नका. कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा ते राष्ट्रवादीत सहभागी झाल्याने महायुतीचीच ताकद या ठिकाणी वाढविण्याचे काम आमदार दाते यांनी केलेले आहे, मात्र याची जळजळ का होते हे समजायला मार्ग नाही.आ. दाते संयमी असतील मात्र त्यांच्यावर बोलल्यानंतर आम्ही संयम ठेवणार नाही, याची नोंद मित्रपक्षांनी व संबंधित कार्यकर्त्यांनी घ्यावी, असा इशारा रोहिदास लामखडे यांनी दिला आहे.










