…तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; आज काय काय घडलं
मनोज जरांगे पाटील कडाडले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला वेगळं वळण आले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत अभिजीत दिपके आणि आंदोलकांची भेट घेतली. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील दिल्लीत दाखल झाले. जंतर-मंतरवर जाऊ त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
जंतर-मंतरवरून मनोज जरांगे पाटील यांनी मोदी सरकारला थेट इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, शांततेच्या आंदोलनात ताकद आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत. जागा फक्त सोडू नका त्यांना आपण निवडून दिलेले आहे. आपण आणि आपल्या मायबापांनी यांना मतदान केले. आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केले. आपल्या जिल्ह्यांनी तालुक्यांनी यांना मतदान केले आहे. पण आज हेच आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा- बाळांवरती उलटले आहेत. यांना उलटे करण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आणि राज्यातील गोरगरीब जनतेमध्ये आहे हे यांच्या लक्षात नाही आहे.
तसंच, ‘जर या पुढच्या काळात तुम्हाला जर कुठे धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. सर्व देश, राज्य तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द मी देतो. पुन्हा जर लाठीचार्ज केला तर महाराष्ट्रात यांना फिरू देणार नाही.’, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मोदी सरकारला दिला आहे. इथे जी पोरं बसले आहेत त्यांची तळमळ आहे. पण एखाद्या निर्णयामुळे त्यांची तळमळ मोडू नये. शांततेत राहिले तर न्याय मिळतो. जंतर मंतरची जागा ही आंदोलनाची जागा आहे त्यामुळे इथे ते काही करू शकत नाहीत त्यामुळे आंदोलकांनी ही जागा सोडून नये.’, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केले.
‘गेल्या १० वर्षात १५२ पेपर फुटले, तरी कोणालाही शिक्षा नाही’, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्यांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात येत आहे. याच मुद्यावरून सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला. मात्र, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याच्या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात देखील उमटले आहेत. यावरूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. यानंतर आज (२२ जुलै) राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकावर जोरदार टीका केली.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी रास्त असल्याचं सांगत देशात गेल्या १० वर्षात तब्बल १५२ पेपर फुटले आहेत, तरी कोणालाही शिक्षा झाली नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
“सध्या देशात हे का घडत आहे? आमच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यासारखं एवढं विद्यार्थ्यांनी काय केलं होतं? ते शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते. त्यांचा कोणत्याही गुन्ह्याशी संबंध नव्हता. सध्या देशात पेपरफुटी ही खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. नीट पेपर फुटीच्या घटनेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. गेल्या १० वर्षांत १५२ पेपर फुटले आहेत, तरी देखील कोणालाही शिक्षा नाही”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनावरून राजकारण आता चांगलेच तापले आहे. सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी अभिजीत दिपकेंसह आंदोलकांची भेट घेतली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री दिल्लीमध्ये गेले आणि त्यांनी आंदोलकांची भेट घेतली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का?, असा खोचक टोला सरकारला केला.
उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनावरून सरकारवर घणाघात केला. त्यांनी सांगितले की, ‘शिवसेना पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. काल राहुल गांधी यांनीही याविरोधात आंदोलन केले. या सरकारची विद्यार्थ्यांशी असणारी वागणूक अत्यंत वाईट आणि संतापजनक आहे. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्ता आणि अहंकाराची हवा गेली आहे. पण जनताच त्यांना योग्य वेळी जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही.’
‘कुणीही आंदोलन करत असेल, तर त्यांच्याशी संवाद साधणे आणि चर्चा करणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. जर आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू असेल तर त्यांची समजूत काढणे हे देखील प्रशासनाचे काम असते. मात्र, केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने संवादच झाला नाही. सरकारने वेळीच चर्चेची भूमिका घेतली असती तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती.’ असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
सरकारला विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मी पहिल्या दिवसापासूनच सर्वांना पूर्ण पाठिंबा देत आलो आहे. मी काय करतोय हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. तरुण हे या देशाचे भविष्य आणि भाग्य आहेत. पण जर तुम्ही या तरुणांचे भाग्यच चिरडून टाकणार असाल तर ते अत्यंत घातक आहे. त्यांची तुलना ‘झुरळां’शी करणे हा नीचपणा असून हे अतिशय वाईट आहे. आज जर तुम्ही या देशाच्या आधारस्तंभालाच तुडवणार असाल तर ही तरुणाई तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तरुणांशी संवाद साधायला तुम्हाला कसली लाज वाटतेय? लोकशाहीत चर्चेनेच प्रश्न सुटतात, हे सरकारने लक्षात ठेवावे.’
तसंच, ‘कुणीही आंदोलन करत असेल, तर त्यांच्याशी संवाद साधणे हे सरकारचे काम आहे. जर आंदोलन चुकीच्या मार्गाने जात असेल, तर त्यांची समजूत काढणे ही देखील प्रशासनाचीच जबाबदारी असते. परंतु, केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने चर्चाच झाली नाही. सरकारने जर वेळीच पुढाकार घेऊन संवाद साधला असता, तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती.’, असे मत देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘देशाचे भवितव्य असलेल्या तरुणांवर सरकारकडून अत्यंत क्रूरपणे अत्याचार सुरू आहेत, असा थेट आरोप करत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. देशात अराजकता पसरवण्याचा डाव स्वतः सत्ताधाऱ्यांचाच आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी त्यात ‘पाकिस्तानी हात’ असल्याचा अजेंडा चालवला जात आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की, सत्ताधाऱ्यांमध्येच कुणी पाकिस्तानी आहे का? आज या सत्ताधाऱ्यांपेक्षा इंग्रज बरे होते, असे म्हणायची वेळ देशातील जनतेवर आली आहे.’, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील आंदोलक आतंकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचं डोकं ठिकाणावर आहे का?
लोकशाही देशात जंतर मंतरवर शैक्षणिक हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ठोकशाही मार्गानं पोलिसांनी लाठीचार्ज केला…तरुण- तरुणींवर इथल्या सत्ताधाऱ्यांच्या आदेशानं नोकरदार अधिकाऱ्यांनी बेफाम लाठ्या काठ्या चालवल्या…तरुणांनीही लाठ्या काठ्यांचा मार झेलत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा घेतला…मात्र आता सत्ताधारी आमदार निर्लज्जपणे विद्यार्थ्यांना थेट आतंकवादी म्हणतायत… सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना थेट ‘आतंकवादी’ म्हटलं…खोत इतकचं बोलून थांबले नाही तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणमंत्री म्हणून धर्मेंद्रचं राहणार… असं खोतांनी ठासून सांगितलं…
दरम्यान सदाभाऊ खोतांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा दिल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झाले… सत्तेत मशगूल झाल्यानं तुमचे विचार लुळे पांगळे झाल्याची टीका काँग्रेसनं केलीय…दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या नागपूरच्या भारत बाणाईत या तरुणावर पोलिसांनी लाठीचार्ज केला…भारतच्या आक्रोशाचे व्हिडिओ व्हायरल झाले… त्यामुळे आमचा मुलगा आतंकवादी नाही तो हक्कासाठी लढतोय, असा संताप भारतच्या वडिलांनी व्य़क्त केलाय…
एसटी कर्मचारी आंदोलन, शेतकरी हमीभाव आंदोलनात सदाभाऊ खोतांनी अनेक वेळा रस्त्यावरची लढाई लढलीय…मात्र सत्ताधारी बाकावर जाताच सदाभाऊ आंदोलनाची भाषा विसरले आणि थेट आंदोलकांनाच दहशतवादी ठरवलं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रक्तानं माखलेला जंतर-मंतरचा रस्ता आणि दुसरीकडे त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी राजकीय विधानांमुळे सदाभाऊंचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय…
शरद पवार-सुप्रिया सुळे यांनी घेतली PM मोदींची भेट
राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट (NEET) परीक्षेतील अनियमिततेवरून कॉकरोच जनता पक्षाने (CJP) सुरू केलेल्या आंदोलनाच्या आणि गदारोळाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेचा तपशील अद्याप कळलेला नाही. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर मंतरवर पोहोचून सीजेपी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चळवळीला उघडपणे पाठिंबा दिल्यानंतर आणि पोलिसांच्या कारवाईचा निषेध केल्यानंतर अवघ्या एका दिवसात ही भेट झाली आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या या उच्चस्तरीय भेटीमुळे अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
सरकार शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही?”, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि ‘आप’ने आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट करताना काँग्रेसने आंदोलनाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या मुद्याला समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केजरीवालांनी CJI यांच्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला. केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “सरकारने त्यांचं काम केलं नाही, त्यानंतर सरकारला जाब विचारण्यानंतरही समाधान न मिळाल्याने लोक रस्त्यावर उतरले, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. शिक्षणमंत्री राजीनामा का देत नाहीत, अनेक मंत्री येतात आणि जातात, शिक्षण व्यवस्था सुधारायला हवी”, असे म्हणत या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे केजरीवाल म्हणाले. “सरकारने सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं, आंदोलकांवर लाठीचार्ज केला तरी देखील आंदोलन मोठे झाले. मेट्रो स्टेशन बंद केले तरी हे तरुण कोणत्या ना कोणत्या मार्गाने आंदोलनात सहभागी होतील”, असे केजरीवाल म्हणाले.
आंदोलनाला पाठिंबा असल्याचे वक्तव्य
“उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आम आदमी पक्षाकडून देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या मुद्याला आमचा पाठिंबा आहे. सर्वांनीच या आंदोलनात सहभागी व्हायला हवं”, असे आवाहन केजरीवाल यांनी केली. २०२४ मध्ये नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंडला डिफॉल्ट बेल मिळाली, असा आरोप केजरीवाल यांनी केला. पेपरफुटीतील संशयितांना डिफॉल्ट बेल मिळत असल्याचा दावा केजरीवालांनी केला.
अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय!’ अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आणि एकूणच तरुणांच्या शिक्षण व्यवस्थेविषयीच्या प्रश्नावर याआधीही अभिनेता हेमंत ढोमे व्यक्त झाला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी पक्षातील खासदारांवर कारवाई करण्यात आल्यानंतर हेमंत ढोमे ने instagram वर स्टोरी पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. तो म्हणाला ‘ भारताचा विरोधी पक्षनेता असा उचलून नेणाऱ्या अहंकारी सरकारचा अंत आता जवळ आला आहे! आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार हे नक्की!’ असं तो या पोस्टवर म्हणालाय.
नेमकं घडतंय काय?
नीट पेपर फुटीवरून कॉकरोच जनता पार्टीने आयोजित केलेलं आंदोलन आणि त्यानंतरचा संसद मोर्चा आता एका मोठ्या जनआंदोलनात रूपांतरीत झालाय .. 20 जुलै रोजी ‘चलो संसद रॅली’ दरम्यान संसदेवर धडकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलन पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांना फोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांची लाट्या काठ्यांनी डोकी फोडण्यात आली. आंदोलन मोडीत काढण्यासाठी केलेल्या या कारवाईमुळे परिस्थिती आणखी चिघळली.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता आणखी टोकदार झाली आहे.
आंदोलनादरम्यान कोणतीही ‘नारेबाजी’ चालणार नाही! केवळ ‘या’ चार घोषणा देण्याचं ‘सीजेपी’कडून आवाहन
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून मागच्या महिन्याभरापासून दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर तरुणांचं आंदोलन सुरु आहे. नव्यानेच उदयास आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये नाना तऱ्हेच्या घोषणा दिल्या जात असल्याची बाब समोर आलेली होती. त्या पार्श्वभूमीवर आता सीजेपीने चार घोषणांची अधिकृत माहिती दिली आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि वाढता तणाव लक्षात घेता, सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी आंदोलकांसाठी केवळ चार अधिकृत नारे निश्चित केल्याचं सांगितलं आहे. आंदोलनाची बदनामी करण्यासाठी विरोधक टपून बसले असून त्यांना कोणतीही संधी मिळू नये, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१. भारत माता की जय
२. इन्कलाब जिंदाबाद
३. जय भीम
४. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या
”इतर घोषणाबाजी खपवून घेणार नाही”
आंदोलनस्थळी जमलेल्या हजारो तरुणांना संबोधित करताना आशुतोष रांका म्हणाले, “विरोधी गट आपल्या आंदोलनाविरोधात उलट-सुलट नरेटिव्ह तयार करण्यासाठी केवळ एका चुकीच्या संधीची वाट पाहत आहेत. आपल्याला त्यांच्या जाळ्यात अडकायचे नाही. त्यामुळे या चार घोषणांशिवाय कोणताही पाचवा नारा आंदोलनात दिला जाणार नाही. जर कोणी आक्षेपार्ह किंवा भरकटवणारी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तात्काळ शांत करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असेल.”
जंतर मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत ‘अदृश्य हात’; देशभरातून पिझ्झा, बर्गरसह जेवणाची ऑर्डर
दिल्लीत जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीकडून आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी आणि आंदोलक आले आहेत. या आंदोलकांसाठी देशभरातून ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या ऑर्डर पाठवल्या जात आहे. अनेक फूड डिलिव्हरी कंपन्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून ऑर्डर येत असून त्याचा पत्ता जंतर मंतरचा दिला जात आहे. दिवसा आणि रात्रीही फूड डिलिव्हरी करणारे डिलिव्हरी बॉय आंदोलकांना पिझ्झा बर्गर आणून देत आहेत.
कनॉट प्लेसमधील वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ऑर्डरमध्ये वाढ झालीय. या ठिकाणी मुंबई, हैदराबाद, दिल्लीसह इतर राज्यांमधून जंतर मंतरसाठी ऑर्डर दिल्या जात आहेत. डिलिव्हरी बॉयना जंतर मंतरवर कोणत्याही आंदोलकाला हे जेवण किंवा पदार्थ द्या असं सांगण्यात येत आहे. दिल्लीतील एका डिलिव्हरी बॉयने सांगितलं की, जंतर मंतरवर किमान १० ऑर्डर दिल्या आहेत. माझ्यासोबत इतर काही सहकारी आहेत तेसुद्धा जंतर मंतर परिसरातच ऑर्डर घेऊन येतायत. या ऑर्डर देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्या आहेत. मात्र पत्ता जंतर मंतरचा आहे. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलकांसाठी पिझ्झा, बर्गर, समोसा, जेवण यासह इतर खाद्यपदार्थ पाठवले जात आहेत. एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. भरपावसात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना जेवणाचं पाकिट देताना डिलिव्हरी बॉय म्हणतो की मुंबईतील एका व्यक्तीनं पेमेंट केलं असून जंतर मंतरवर द्यायला सांगितलं आहे.










