काकांनी नगरवरील प्रेम कधीही कमी होऊ दिले नाही; ते समतावादी विचारांचे लोकनेते
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महात्मा फुले चौक येथे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अरुणकाका जगताप ट्रस्ट मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या २० फुटी भव्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात काकांच्या कार्याचा गौरव करत मित्रमंडळींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप, गुणे आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक विकी जगताप, प्रकाश भागानगरे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक संजय चोपडा, सुमतिलाल कोठारी, राजेंद्र चोपडा, शिवाजी चव्हाण, प्रा. माणिकराव विधाते, बाळासाहेब पवार, नगरसेवक महेश तवले, बाबूशेठ नागरगोजे, माजी सभापती अविनाश घुले, विपुल शेटिया, गोरख पडोळे, प्रकाश कराळे, जनक अहुजा, राजेश भंडारी, अजित जगताप, मंगेश खताळ, भाऊसाहेब पांडुळे, ज्ञानदेव पांडुळे, धर्मा कराडे, डॉ. विजयकुमार भंडारी, संतोष सूर्यवंशी, तुकाराम तावरे, वैभव जगताप, ज्ञानेश्वर रासकर, विशाल पवार, शिवाजी भंडारी, अनिल मुरकुटे, दत्ता पानसरे, विजय गव्हाळे, मोहित पंजाबी, नरेंद्र बाफना, भाऊ हुच्चे, कांता अष्टेकर, योगेश ठुबे, प्रा. अरविंद शिंदे, सत्यम गुंदेचा, मोहन कदम, श्यामराव भिंगारदिवे, लक्ष्मण पोकळे, राजेंद्र ओस्तवाल, सागर मुर्तडकर, अजिंय बोरकर आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी मित्रमंडळींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सांगण्यात आले की, महात्मा फुले चौक आणि अरुणकाका यांचे अतूट नाते होते. काकांना भेटण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येत असत. त्यांच्या दृष्टीने गरीब-श्रीमंत, जात-पात असा कोणताही भेदभाव नव्हता. सर्व जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. नगर शहरावरील त्यांचे प्रेम कधीही कमी झाले नाही.
स्वतः व्यसनांपासून दूर राहून त्यांनी युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला. काका हे एक परीस होते, त्यांच्या सहवासात आलेल्या अनेकांचे जीवन सकारात्मक दिशेने बदलले. त्यांच्या विचारांमुळे आम्ही वाईट प्रवृत्तींपासून दूर राहिलो. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे आणि अडचणीच्या काळात धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि कार्य आपल्यामध्ये जिवंत आहेत. ते समतावादी विचारांचे नेते होते. सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. शहरात त्यांचा आदरयुक्त दरारा होता. त्यांनी माणसे पदाने नव्हे तर मनाने कमावली होती, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सारसनगर येथे उभारण्यात आलेल्या भव्य स्पोटर्स कॉम्प्लेसला माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप यांचे नाव देण्याची मागणी करण्यात येणार आहे. या क्रीडा संकुलातून भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडतील. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून हे क्रीडा संकुल शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल.
उद्योजक राजेंद्र चोपडा म्हणाले की, नगर शहरातील आनंदऋषी हॉस्पिटल उभारण्यात स्वर्गीय अरुण काका जगताप यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे रुग्णालय उभे राहिले असून आज हजारो गोरगरीब नागरिकांना येथे दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहे. समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी सांगितले की, महात्मा फुले चौकात उभारण्यात आलेली काकांची २० फुटी भव्य प्रतिमा ही केवळ स्मारक नसून त्यांच्या विचारांचे प्रेरणास्थान आहे. या प्रतिमेमुळे भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याची आणि समाजसेवेची प्रेरणा मिळत राहील.










