- जाहिरात -spot_img
breaking news

रुईछत्तीशीत दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, खिडकीचे गज कापून सव्वा लाख लांबवीले

परस्परविरोधी फिर्याद दाखल | ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील रुईछत्तीशी गावात जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी बॅटने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत एकाच कुटुंबातील वृद्ध व्यक्तीसह तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून, नगर तालुका पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमजान पठाण यांना त्यांच्या घरासमोर भांडण सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी जयद सादीक पठाण, समद पठाण, जुलेखा पठाण, सादीक पठाण आणि रजिया काझी यांनी फिर्यादीच्या नातेवाईकांना लाकडी बॅट, कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. या हल्ल्यात एका आरोपीने कोयत्याने वार करून फिर्यादीच्या नातेवाईकांच्या मानेवर आणि डोयावर गंभीर दुखापत केली. तसेच एका वृद्ध व्यक्तीच्या डोयातही कोयता लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीलाही आरोपींनी पकडून ठेवून बॅटने बेदम मारहाण केली. या गोंधळात कुटुंबातील महिलांनाही जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करण्यात आली. या झटापटीत सोन्याचे दागिने गहाळ झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. जखमींवर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खरमाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सांडपाणी अंगणात सोडल्याने हाणामारी
अहिल्यानगर : सांडपाणी अंगणात येण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, लाकडी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना नगर तालुयातील रुईछत्तीशी येथे घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुईछत्तीशी येथील फिर्यादी महिलेच्या घरासमोर आरोपींनी धुण्याभांड्याचे पाणी सोडल्याने अंगणात चिखल होत होता. हे पाणी आमच्या अंगणात येऊ देऊ नका, असे समजावून सांगत असताना आरोपींना या गोष्टीचा प्रचंड राग आला. यावेळी आरोपी अस्लम इकबाल शेख, रमजान इकबाल पठाण, शाहरुख हसन शेख, निलोफर शाहरुख शेख, अल्लाबकस दुलेखौँ पठाण आणि गजरा हसन शेख यांनी बेकायदेशीर मंडळी जमवून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लाकडी काठीने दुखापत केली. तसेच मपुन्हा नादाला लागलात तर तुम्हा सर्वांना तलवारीने कापून टाकूफ अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस हवालदार खरमाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  सकल हिंदू समाजाचा मनपावर वराह पालन जनआक्रोश मोर्चा; आ. जगताप, बेग यांनी काय दिला इशारा पहा

खिडकीचे गज कापून सव्वा लाखाचा ऐवज लंपास
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
केडगाव परिसरातील नगर-पुणे महामार्गावर असलेल्या काकडे मळा भागात दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

रामदास शंकर काकडे यांचा बांधकाम व्यवसाय असून ते ज्ञानेश्वर हॉटेलच्या मागे कुटुंबासह राहतात. १५ एप्रिल रोजी रात्री सर्व कुटुंब जेवण करून झोपले होते. फिर्यादी, त्यांची पत्नी आणि आई घरासमोरील भागात झोपले होते, तर मुलगा आणि मुलगी घरात झोपलेले होते. पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास मुलीला जाग आली असता, दोन अनोळखी व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून घरातील सामान चोरत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी घराच्या किचनमधील खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला होता. घरातील बेडमधील लोखंडी कपाटाचे दरवाजे तोडून लॉकरमधील दीड तोळ्याची सोन्याची साखळी, सोन्याचे कानातील दागिने, पितळी मूर्ती आणि ४० हजार रुपयांची रोख रक्कम असा माल लंपास केला. चोरीची ही घटना लक्षात येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या धाडसी चोरीप्रकरणी रामदास काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

विवाहितेचा सासरी छळ
अहिल्यानगर ः शहरातील नालेगाव परिसरात राहणार्‍या एका ३३ वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. २०१६ पासून ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेचा विवाह झाल्यानंतर सांगळे गल्ली परिसरात ती राहत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पती सागर सोनार, सासू साधना सोनार, सासरे प्रशांत सोनार आणि इतर नणंदांनी तिला किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी विवाहितेसह तिच्या मुलींच्या उदरनिर्वाहाची कोणतीही सोय न करता त्यांना वार्‍यावर सोडले आणि ते पुणे येथे निघून गेले. यामुळे मायलेकींवर उपासमारीची वेळ आली आहे.पीडितेने यापूर्वी भरोसा सेल कडे दाद मागितली होती. तेथे समुपदेशन करूनही सासरच्या मंडळींच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही आणि हा वाद मिटू शकला नाही. अखेर पीडितेने कोतवाली पोलीस ठाणे गाठून आपली आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ