अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिममध्ये व्यायाम करण्यासाठी येणार्या महिलांकडे एकटक पाहिल्याचा जाब विचारल्यामुळे एका जिम ट्रेनरला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस दलातील अंकुश जाधव आणि विवेक आहिरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी सदाम हुसेन इद्रीस शेख हे कोहिनूर मॉल येथील एका जिममध्ये व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जिममध्ये येणार्या काही महिला सदस्यांनी आरोपींच्या वर्तनाबाबत तक्रार केली होती. यावरून शेख यांनी अंकुश जाधव याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने वर्दीचा माज दाखवत शेख यांना खोटी कारवाई करण्याची धमकी दिली.
३१ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास शेख हे कोठला चौक परिसरात गेले असता, आरोपींनी त्यांना अडवले. ओळखीचा फायदा घेऊन त्यांना चारचाकी वाहनात बसण्यास सांगितले आणि तिथेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे नेऊन दोघांनी त्यांना लाथाबु क्क्यांनी बेदम मारहाण केली. पीडित तरुण तेथून सुटून जात असताना पुन्हा नटराज हॉटेलसमोर त्याला अडवून मारहाण करण्यात आली. महिलांच्या सन्मानासाठी आवाज उठवणार्या जिम ट्रेनरवरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे.
जिम ट्रेनरकडून इन्शुरन्स अॅडव्हायजरवर पिस्तूलने हल्ला
अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिममध्ये स्टेरॉईड्स घेण्यास नकार दिल्याच्या रागातून आणि पोलीस अधिक्षक कार्यालयात तक्रार केल्याचा संताप मनात धरून एका जिम ट्रेनरने त्याच्या साथीदारांसह एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरा कॉलनीतील रहिवासी आणि इन्शुरन्स अॅडव्हायजर विवेक दामोदर आहिरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आहिरे हे कोहिनूर मॉलवरील एका जिममध्ये व्यायामासाठी जातात. तेथे जिम ट्रेनर सद्दाम हुसेन इद्रीस शेख याने आहिरे यांना शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी स्टेरॉईड्स घेण्याचा आग्रह धरला होता. आहिरे यांनी त्यास नकार दिला. या कारणावरून सद्दामने त्यांना जिममध्ये अपमानास्पद वागणूक दिली. या त्रासाला कंटाळून आहिरे यांनी ३१ मार्च रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात सद्दामविरुद्ध अर्ज दिला होता.याचाच राग मनात धरून रात्री दहाच्या सुमारास जेव्हा आहिरे हे त्यांच्या मित्रासोबत हॉटेलबाहेर उभे होते, तेव्हा सद्दामने त्यांना गाठले. माझ्याविरुद्ध अर्ज का दिला? असे विचारत त्याने आहिरे यांना धमकावले. त्यानंतर राधाबाई कॉलेजसमोर सद्दाम आणि त्याच्या ७ ते ८ साथीदारांनी आहिरे यांना अडवले. सद्दामने त्याच्या हातातील पिस्तूलने आहिरे यांच्या डोयावर प्रहार केला, तर त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या झटापटीत आहिरे यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैनही हिसकावण्यात आल्या आहेत. जखमी आहिरे यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कौडगाव येथे मायलेकास बेदम मारहाण
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील कौडगाव येथे जुन्या वादातून दोन तरुणांनी एका शेतकर्यासह त्यांच्या आईला लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात विजय बबन नवथर आणि समाधान (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी तुषार संतोष कदम हे शेती करून आपले जीवन जगतात. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपी विजय नवथर आणि समाधान हे दोघे हातात लोखंडी गज घेऊन फिर्यादीच्या समोर आले. ’तू लय माजला आहेस का?’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही समजण्याच्या आतच आरोपींनी आपल्या हातातील लोखंडी गजाने तुषार यांच्यावर हल्ला चढवला.हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादीची आई मध्यस्थी करण्यासाठी आली असता, आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या आईला देखील लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत केली. या हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. जखमींना तातडीने उपचारासाठी शहरातील म्हस्के रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक कर्डक या करत आहेत.
क्रिकेटच्या वादातून भातोडीत हाणामारी
अहिल्यानगर – तालुयातील भातोडी गावात क्रिकेटच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले आहे. या घटनेत लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला असून, हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. जुन्या वादाची कुरापत काढून आरोपी शकील बबलू सय्यद, दगडू अब्दुलरहेमान शेख, फिरोज नजीर सय्यद आणि अरमान फिरोज सय्यद (सर्व राहणार भातोडी) हे हातामध्ये लाकडी दांडके, लोखंडी पाईप आणि रॉड घेऊन आले. त्यांनी फिर्यादीच्या नातेवाईकाने क्रिकेट स्पर्धेच्या वेळी केलेल्या वादाचा आणि मोबाईल फोनवर संपर्क साधल्याचा जाब विचारला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावले. वादाचे स्वरूप वाढल्याने आरोपींनी हातातील शस्त्रांनी बेदम मारहाण सुरू केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या हाताच्या बोटावर लोखंडी रॉडचा जोरात फटका बसल्याने त्यांचे बोट मोडले असून गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लोखंडे करत आहेत.
पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
राहाता – राहाता तालुयातील लोणी-आडगाव रोडवर मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणार्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने शिर्डी विमानतळावर कार्यरत असलेल्या दोन तरुण कर्मचार्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी ३१ मार्चच्या रात्री १०:३० वाजेच्या सुमारास प्रशांत कैलास जगदाळे (वय २८, रा. पिंपळस, ता. राहाता) आणि किरण कैलास बावीस्कर (वय २५, रा. लासुर, ता. चौपडा, जि. जळगाव) हे दोघे आपल्या कामावरून परतत असताना आडगाव शिवारात त्यांच्या दुचाकीला पिकअप वाहनाने जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दोन्ही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर तातडीने दोघांनाही लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमकार खोस्नाने यांनी त्यांना तपासात मृत घोषित केले.










