शेतकर्यांना फायदा, ग्राहकांना झटका | भाजीपाल्याचे भाव कोसळले
सुनील चोभे / नगर सह्याद्री –
यंदा मार्च महिन्यापासूनच वाढलेल्या उष्णतेचा, हवामानातील बदलाचा तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम भाजीपाला बाजारावरही दिसू लागला आहे. उत्पादन घटल्यामुळे सध्या बाजारात लिंबाचे दर झपाट्याने वाढले असून किरकोळ बाजारात एका किलोसाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत. मिरचीनेही शंभरी पार केली आहे.
यंदा मार्च महिन्यातच तापमानात मोठी वाढ झाली. त्याचबरोबर काही भागात अपेक्षेपेक्षा लवकर पावसानेही हजेरी लावली. या बदलत्या हवामानाचा फटका फळबागांना बसला आहे. विशेषतः लिंबू पिकाला आंबेबहार कमी प्रमाणात फुटल्याने उत्पादनावर परिणाम झाला असून बाजारात मालाची आवक कमी झाली आहे.
दरम्यान, बाजारात लिंबाचा पुरवठा कमी झाल्यामुळे मागणीच्या तुलनेत उपलब्धता घटली आहे. परिणामी किरकोळ बाजारात लिंबाचे दर १०० ते १२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. काही ठिकाणी एका लिंबासाठी ५ ते १० रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र आहे. नवीन माल बाजारात येईपर्यंत दरांमध्ये मोठी घट होण्याची शयता कमी आहे. त्यामुळे सध्या तरी ग्राहकांना महागड्या लिंबांचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हवामानातील अनिश्चिततेमुळे फळबागांचे उत्पादन कमी होत असल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. पुढील काळात हवामान अनुकूल राहिल्यासच उत्पादनात वाढ होऊन दर स्थिर होण्याची शयता व्यक्त केली जात आहे. सध्या भाजीबाजारात कोबी ५ ते ६ रुपये किलो, फ्लावर ७ ते ८ रुपये, वांगी १० ते १५ रुपये आणि टॉमेटो १० ते १२ रुपये किलो मिळत आले.
युद्ध अन उष्णतेने लिंबाचे भाव वाढले
मे महिन्यापासून सुरु होणारी उष्णता यंदा मार्चमध्येच जाणवू लागली आहे. इराण-इस्त्राईल-अमेरिका युद्धाचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. लिंबू, मिरचीचे भाव वाढले असून कोबी, फ्लावर, वांगी, टॉमेटॉचे भाव कमी झाले आहेत.
– बाबासाहेब झरेकर, लिंबू विक्रेते
हवामानबदलाचा परिणाम
यंदा पाऊस लवकरच झाल्याने लिंबाचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच युद्धाचा परिणाम लिंबावर झाला असून मार्चमध्येच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने लिंबाच्या दर वाढले आहेत.
– शरद चोभे, (खरेदी, विक्रेते)










