श्रीगोंदा | नगर सह्याद्री
शाळा आणि महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत श्रीगोंदा पोलिसांनी शुक्रवारी विशेष मोहीम राबवत टवाळखोरी करणाऱ्या पाच तरुणांवर कारवाई केली.
शाळेच्या परिसरात विनाकारण दुचाकीवरून फेऱ्या मारणे, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे आणि शांतता भंग केल्याप्रकरणी या तरुणांना ताब्यात घेण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काही तरुण शाळा व महाविद्यालय परिसरात दुचाकींवरून घिरट्या घालत असल्याच्या तसेच विद्यार्थिनींना त्रास होईल, असे वातावरण निर्माण केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने साध्या वेशात शाळा परिसरात सापळा रचला. या कारवाईदरम्यान शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विनाकारण थांबलेल्या तरुणांची चौकशी करण्यात आली. ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तसेच सायलेन्सरमध्ये बदल करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या दुचाकींवरही कारवाई करण्यात आली.
हुल्लडबाजी करणाऱ्या पाच तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या तरुणांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची टवाळखोरी किंवा विद्यार्थ्यांना त्रास दिल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.शाळा किंवा महाविद्यालय परिसरात छेडछाड, टवाळखोरी किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.










