- जाहिरात -spot_img
breaking news

भरता प्रमणे भाऊ अपेक्षित असेल तर स्वतः आधी ‘राम’ व्हा : रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांचे आवाहन

रामकथेतील शबरी भेटीचे वर्णन ऐकून भाविकाचे डोळे पाणावले
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
राम कथा आपल्याला शौर्य, वचनबद्धता, भक्ती व बंधुप्रेम शिकवते. त्यामुळे ती कुटुंबासह श्रवण करणे महत्त्वाचे आहे. आपला भाऊ भरत सारखा आपल्याला अपेक्षित असेल तर आपण स्वतः आधी राम आहोत का हे तपासले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांनी सोमवारी केले. यावेळी कथेत राम-भरत भेट आणि प्रभू रामाने शबरीची घेतलेली भेट या प्रसंगांचे वर्णन करताना स्वतः डॉ.विश्वास यांच्यासह भाविकांचेही डोळे पाणवले. उपस्थितांनाही गहिवरून आले.

माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या स्मृतीनिमित्त येथील काका ट्रस्ट व जगताप परिवाराचे वतीने आयोजित ‘अपने अपने राम’ या रामकथा प्रवचनात दुसरे पुष्प डॉ. कुमार विश्वास यांनी गुंफले. यावेळी बोलताना त्यांनी राम कथा सर्वांना माहीत आहे, परंतु ती प्रत्येकाच्या जीवनाशी कशी निगडित आहे हे जाणून घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले.

दुसऱ्या दिवशीच्या कथेची सुरवातिला बडीसाजन ओसवाल संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, मंदारबुवा रामदासी, डॉ. हर्षवर्धन तमनर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, धनश्री विखे, नानासाहेब फाटके, अनिल पोखरणा, मोहनलाल मानधना आदींच्या हस्ते श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाच्या मुर्त्यांचे पूजन झाले. रामकथेचे विवेचन ऐकण्यासाठी शहरासह जिल्ह्यातून हजारो नागरिकांनी अलोट गर्दी केल्याने एक लाख स्क्वेअर फुटाचा भव्य मंडपही कमी पडला. त्यामुळे मंडपाच्या बाहेरही शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. काका ट्रस्टचे कार्यकर्ते सर्व भाविकांसाठी व्यवस्था करण्यासाठी धावपळ करत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप व आ.संग्राम जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले.

डॉ. विश्वास पुढे म्हणाले, श्रीरामांना वनवासात धाडणारी माता कैकयी हिला सर्वांनी दोष दिला असला तरी खरे तर तिचे सर्वांनी आभार मानले पाहिजे. ती खलनायिका नाही. महालातील रामाला तिने सर्व सामान्यांचा राम केल्याने तिचे आभार मानले पाहिजे. तिच्यामुळे जगत कल्याण झाले, असे स्पष्ट करून डॉ. विश्वास म्हणाले, खरे तर रामायणात कोणीही खलनायक नाही. कैकयी, रावण, शूरपणखा ही सगळी व्यक्तिमत्व त्यांच्या कर्मातून जीवनात काय चांगले व काय वाईट याचे दाखले देतात. रावण हा अनाचार व अहंकाराचे प्रतीक आहे.

हे सुद्धा वाचा :  दूध उत्पादनाचा संगमनेर पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरणार; महाराष्ट्र -पंजाबमध्ये सामंजस्य करार

शूरपणखा वासनेचे प्रतीक तर शबरी वात्सल्य दर्शवते, बिभीषण शरणागताचा उद्धार दर्शवतो, सुग्रीव मैत्रीची कर्तव्याची जाणीव देतो तर हनुमंत भक्तीची ताकद दाखवतो. या सर्वांचे परमेश्वरा प्रति असलेली भक्ती रामायणातून स्पष्ट होते. आधीच्या काळात देव स्वर्गात व दानव पातळात राहायचे, नंतरच्या काळात देव अयोध्येत व दानव लंकेत राहायचे. पुढच्या काळात देव-दानव हे पांडव व कौरव या एका कुळातच राहू लागले व आताच्या काळात देव आणि दानव दोघेही मानवी शरीरातच आहेत. त्यामुळे आपल्या शरीर व मनात चांगले की वाईट कृत्य करायचे याचा संघर्ष कायम सुरू असतो. त्यामुळे प्रत्येकाने ठरवले पाहिजे आपल्यातील देव जागवायचा की दानवाच्या आहारी जायचे ते, असे भाष्य कुमार विश्वास यांनी केले.

कथेत ते पुढे म्हणाले, वनवासातील रामाला भेटण्यासाठी भरत अनवाणी पायाने येत असताना त्याला पायात काटे टोचू नये म्हणून ते काढण्याची आज्ञा रामाने वनदेवीला दिली. त्या मागचे कारण भरतातील राम भक्तीची जाणीव रामाला होती. त्यामुळे आपल्या कुटुंबात जर आपले भाऊ भरतासारखे असणे अपेक्षित असेल तर रामा सारखी संवेदना त्यांच्याविषयी आपण जपतो का याचेही आत्मपरीक्षण करायला हवे. असे आवाहन केले.

डॉ. विश्वास यांनी राम कथेचे अनुषंगाने दिलेले जीवन दाखले टाळ्यांची दाद मिळवून गेले. मुघल आक्रमकांनी रामाचे मंदिर तोडले तरी आमच्या हृदयातील राम तुम्ही तोडू शकत नाही. मृत्यूचे भय दूर करण्याचे काम राम कथा करते. अरुणकाका शरीराने जरी अस्तित्वात नसले तरी त्यांच्या सामाजिक कामाचे यश सर्वांच्या मनात आहे. स्वतःसाठी प्रत्येक जण जगतोच पण समाजासाठी जगणाऱ्यांना मनातून मान सन्मान मिळतो, असेही ते म्हणाले. मुलांनी कोणतेही वाईट पाउल उचलू नये म्हणून त्यांच्याशी सतत संवाद हवा, त्यांना वेळ द्यायला हवा. करोनाने जीवनाची नश्वरता दाखवली आहे, त्यामुळे उद्या काय घडणार हे कोणी काही सांगू शकत नाही. मृत्यूनंतर नाव व नातेसंबंध गळून पडतात. आजचा दिवस आनंदात व समाजपयोगी कार्यात व्यतीत करून समाज मनात चिरंतन राहणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा :  खाकीचा धाक संपला का? विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, शाळा-महाविद्यालयांना पोलीस संरक्षण द्या, आमदार काय म्हणाले पहा...

प्रारंभी देशात गाजलेल्या गायकांनी सादर केलेल्या अनेक अवीट गोडीच्या भजनांमध्ये उपस्थित भाविक तल्लीन झाले. डॉ. विश्वास यांनीही अनेक भजने गाऊन वातावरण भक्तीमय केले.

जंगलातील महिलेने छत्रपतींना दिला योग्य संदेश
यावेळी बोलताना डॉ विश्वास यांनी राम-शबरी भेटीच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंगलात राहणाऱ्या गरीब महिलेने युद्धनीतीचा संदेश दिल्याचा दाखला दिला. युद्ध मोहिमेवरून परतताना छत्रपती जंगलात राहणाऱ्या महिलेच्या कुटीत सैनिकांसह राहिले होते. कशा पद्धतीने शत्रूवर आक्रमण केले तर तुमच्या राजाला यश मिळेल याचा सल्ला तिने दिल्यावर ते ऐकून छत्रपतींनी त्यांची युद्धनीती बदलली व गुरिल्ला (गनिमी कावा) अंगीकारून शत्रूला जेरीस आणले व दिल्लीतील उंदराला औरंगजेबला महाराष्ट्रात आणून कुत्ते की मौत दिली, असेही डॉ. कुमार विश्वास यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ