- जाहिरात -spot_img
breaking news

मृत्यूपासून वाचण्यासाठी अरुणकाकांप्रमाणे दुसर्‍यांच्या विचारात जिवंत रहा : डॉ. कुमार विश्वास यांचे आवाहन

स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ ‘अपने अपने राम’ कथा पहिल्याच दिवशी रंगली
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
श्रीराम व श्रीकृष्ण आले अन गेलेही. विश्व त्यांच्या शोकात राहिले नाही. त्यामुळे मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, मात्र, मृत्यूपासूनही वाचता येते व दुसर्‍याच्या विचारात जिवंत राहता येऊ शकते. पण, त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी व छत्रपती शिवरायांसारखे लोकोत्तर जीवनकार्य करायला हवे, असे आवाहन प्रसिद्ध कवी व रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांनी रविवारी सायंकाळी अहिल्यानगरमध्ये केले. अहिल्यादेवी व छत्रपती शिवरायांच्या विचारांना आदर्श मानून आयुष्यभर सामाजिक व धार्मिक काम केलेले स्वर्गीय माजी आमदार अरुणकाका जगताप त्यामुळेच अहिल्यानगरवासीयांच्या मनात व विचारात जिवंत आहेत, असा विश्वासही विश्वास यांनी व्यक्त केला.

माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त येथील काका ट्रस्ट व जगताप परिवाराच्या वतीने डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ या प्रसिद्ध रामकथेचे आयोजन आनंदधाम रस्त्यावरील राष्ट्रीय पाठशाळा मैदानात करण्यात आले आहे. त्याचे प्रथम पुष्प गुंफताना डॉ. विश्वास यांनी राम कथा कशी प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे याचे दाखले देत सविस्तर विवेचन केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे, आमदार सत्यजित तांबे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, पद्मश्री पोपटराव पवार, उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव आदी उपस्थित होते. रामकथेचे कथाकार डॉ. कुमार विश्वास यांचे नगरवासीयांच्या वतीने स्वागत व सन्मान श्रीमती पार्वतीबाई जगताप यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती देऊन केले. यावेळी डॉ. वंदना फाटके, डॉ. शशिकांत फाटके, सचिन जगताप, आमदार संग्राम जगताप, सुवर्णा जगताप, शीतल जगताप, परमेश्वरी व आराध्य जगताप आदींसह जगताप परिवाराने केले. यावेळी रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी, मंदारबुवा रामदासी, अनुराधा नागवडे, बडीसाजन ओसवाल संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, सुनील रामदासी, राजेंद्र चोपडा आदींसह विविध क्षेत्रांतील नागरिक व हजारो भाविक उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  रशियन ग्रँड मास्टरचा नगरमध्ये एकाचवेळी 30 खेळाडूंविरुद्ध सामना... नेमकं कारण काय

प्रास्ताविकात आमदार संग्राम जगताप म्हणाले, वडिलांच्या स्मृतीनिमित्त कर्तव्य भावनेने रामकथेचे आयोजन या पावन संतांच्या भूमीत केले आहे. वडील वैकुंठवासी अरुणकाका जगताप अनेक वर्ष शहराच्या सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते. सर्वांच्या आशीर्वादाने विधान परिषदेवर दोन वेळा प्रतिनिधित्व त्यांनी केले. त्यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी ज्या आध्यात्मिक व धर्म क्षेत्रात काम केले, त्या क्षेत्राशी संबंधित उपक्रम करण्याचा आग्रह सर्वांचा होता. आमच्या परिवारात आजोबांपासून आध्यात्मिक वारसा आहे. ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींची भूमी आहे. या निमित्ताने चांगली व धार्मिक विचारधारा देण्याचा हा उपक्रम आहे. वडिलांच्या स्मृतीनिमित्त व समाजाप्रती आपण काही देणे लागतो या भावनेतून राम कथेचे आयोजन केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी डॉ. कुमार विश्वास यांनी विवेचनातून रामकथेतील अनेक जीवन दाखले दिले. त्यांनी प्रभू श्रीरामांच्या जीवनातील विविध पैलू अत्यंत समर्पक, आधुनिक संदर्भासह व तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनातून उलगडले. अपने अपने राम या संकल्पनेद्वारे प्रत्येकाच्या जीवनात रामाचे वेगवेगळे अर्थ कसे प्रकट होतात, याचे त्यांनी सखोल विश्लेषण केले. त्यांच्या कथनातून राम म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून आदर्श आचरण, कर्तव्यनिष्ठा, संयम, त्याग व मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीचे प्रतीक असल्याचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.

कथेदरम्यान डॉ. विश्वास यांच्या भजनांना उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काव्य, विनोद, तत्त्वज्ञान व जीवनमूल्यांचा सुंदर संगम असलेल्या या रामकथेमुळे संपूर्ण वातावरण राममय, भक्तिमय व प्रेरणादायी झाले. माता जगदंबेचा अंश असलेल्या अहिल्यादेवींनी व छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रभू श्रीरामांचे राम राज्य प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. मानवी शरीर धर्मनिरपेक्ष नाही. झोपेतून उठल्यापासून सायंकाळी पुन्हा झोपेपर्यंत प्रत्येकाचे शरीर विविध शरीर धर्म पाळते. त्यामुळे राजसत्ता ही धर्मनिरपेक्ष असूच शकत नाही. ती जेव्हा धर्मासमवेत चालते तेव्हा अहिल्यादेवींचे व छत्रपती शिवरायांचे शासन अनुभवास येते असे स्पष्ट करून विश्वास म्हणाले, राम कथा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. प्रत्येकाला आई वडील व समाज मोठा करतो. त्यामुळे प्रत्येकाचे जीवन हे देशाचे जीवन असते. हा विचार तरुणाई मध्ये रुजण्यासाठी राम कथा तरुणपणीच ऐकली पाहिजे.

हे सुद्धा वाचा :  युद्ध परिस्थितीवर भाष्य! अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र, मोदीजी, आपण...; अण्णा काय म्हणाली पहा...

सुरेल भजनांनी वातावरण भक्तिमय
डॉ. विश्वास यांची राम कथा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या समवेत आलेले गायक कलावंत नीरजा उपरेती, प्रियांशा शहा, अंकिशा श्रीवास्तव यांनी श्रीरामांचे सुरेल भजने सादर करून वातावरण भक्तिमय करत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. प्रा. प्रसाद बेडेकर व सुशील कुशलेंद्र यांनी सूत्रसंचालन केले. रामकथेच्या यशस्वीतेसाठी काका ट्रस्टचे राजेश भंडारी, नगरसेवक विकी जगताप, अनिल मुरकुटे, गणेश गोंडाळ, शशिकांत घिगे, अजित जगताप, अनुप काळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी नियोजन केले. उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ