- जाहिरात -spot_img
breaking news

​हॉस्पिटलमध्ये १८ लाखांची अफरातफर; भररस्त्यात दागिने लांबवीले, टपरीवर डल्ला, दोन चारचाकी वाहने पळविली…

कॅशियरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
शहरातील माळीवाडा भागातील सरस्वती हॉस्पिटलमध्ये विश्वासाचा भंग करून सुमारे १८ लाख रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल सुरेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विष्णू जगन्नाथ शिरसाट याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू शिरसाट हा एप्रिल २०२५ पासून सरस्वती हॉस्पिटलमध्ये ॲडमिन आणि कॅशियर म्हणून कार्यरत होता. हॉस्पिटलच्या दैनंदिन कामकाजाची आणि बिलांची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, मागील वर्षभरातील बिलांच्या हिशोबात तफावत असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. संशय आल्याने हॉस्पिटलच्या टीमने मार्च २०२६ मध्ये संपूर्ण हिशोबाची पडताळणी केली.

​या तपासणीत कॅशियर विष्णू शिरसाट याने संगनमत करून आणि विश्वासाचा गैरफायदा घेऊन तब्बल १८ लाख रुपयांची अफरातफर केल्याचे स्पष्ट झाले. डॉ. जाधव यांनी या रकमेबाबत विचारणा केली असता, आरोपीने पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. हॉस्पिटलची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२) नुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र औटी करत आहेत.

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
​अहिल्यानगर: शहर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, बुरुडगाव रोड परिसरातील एका महिलेला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. विनायकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांनी एका महिलेशी झटापट करून त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल आणि मणी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना १८ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चंदन इस्टेट जवळील मनाबाई चाळ परिसरात घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रात्रीच्या वेळी घरकाम आटोपून पायी घरी परतत असताना ही घटना घडली. विनायकनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर समोरून आलेल्या मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमांनी महिलेला गाठले. गाडीच्या पाठीमागे बसलेल्या आरोपीने अचानक महिलेच्या गळ्यावर हात टाकून दागिने ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने प्रतिकार केला असता, चोरट्याने त्यांच्याशी झटापट करून मारहाण केली आणि सोन्याचे दागिने घेऊन वेगात पळ काढला. या प्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरत आहे.

हे सुद्धा वाचा :  घरकुलाच्या हप्त्यासाठी मागितली लाच, नगरमध्ये अभियंता, ग्रामसेविकेवर गुन्हा

दिल्ली गेट येथील पान टपरीवर डल्ला; ७ हजारांचा मुद्देमाल लंपास
​अहिल्यानगर: शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिल्ली गेट परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. येथील ‘द पान कॉर्नर’ नावाच्या पान टपरीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ७ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना १८ एप्रिलच्या रात्री ते १९ एप्रिलच्या सकाळच्या दरम्यान घडली आहे.

​याप्रकरणी फिर्यादी ऋग्वेद गोविंद मंगलारप (वय २१) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिल्ली गेट चौकातील मधुर मिठाई शेजारी ऋग्वेद यांची पान टपरी आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने टपरीच्या मागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. टपरीमधील १,५०० रुपयांची रोख रक्कम, ४ हजार रुपये किमतीचा पितळाचा हंडा आणि १,५०० रुपयांची विविध कंपन्यांच्या सिगारेटची पाकिटे असा एकूण ७ हजार रुपयांचा माल चोरून नेला आहे.

​या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक योगेश चव्हाण या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) आणि ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात चोरी झाल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात तपास चक्रे फिरवली आहेत.

गाड्या घेऊन पोबारा करणाऱ्या दोन अट्टल भामट्यांविरुद्ध कोतवालीत गुन्हा
​अहिल्यानगर- शहरातील स्टेशन रोड परिसरातील कायनेटिक चौकातून दोन चारचाकी वाहने विश्वासाने नेऊन ती परत न करता फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​लखन रमेश पुलावळे (वय २८, रा. दत्त मंदिर परिसर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पुलावळे यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून, त्यांच्या ओळखीचा आरोपी ओमकार तुकाराम शेळके (रा. मुखेड, जि. नांदेड) याने फिर्यादीची मोपेड गाडी (क्रमांक एमएच १६ डीवाय ००९२) विश्वासाने घेऊन गेला. तसेच दुसरा आरोपी साहील सिराज शेख (रा. केडगाव, अहिल्यानगर) याने फिर्यादीचे नातेवाईक हिरामण तांबे यांच्या मालकीची होंडा सिटी कार (क्रमांक एमएच १२ के टी २४३०) वापरण्यास नेली होती.

हे सुद्धा वाचा :  सीना नदीच्या पात्रात नवजात अर्भक आढळले, पोलीस आरोपीच्या शोधात

​हे दोन्ही बनावट मित्र मार्च महिन्यापासून या गाड्या वापरत होते, मात्र मुदत संपूनही त्यांनी वाहने परत केली नाहीत. फिर्यादीने वारंवार संपर्क साधूनही त्यांनी टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुलावळे यांनी पोलिसांत धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२) नुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शहर विभागात अशा प्रकारे विश्वासाचा फायदा घेऊन वाहने लंपास करणाऱ्या टोळीमुळे खळबळ उडाली आहे.

गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यावर पोलिसांची धाड; आरोपी फरार
​अहिल्यानगर: शहर उपविभागातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी पहाटे मोठी कारवाई केली. झेंडीगेट परिसरातील सुभेदार गल्ली येथे एका बंद खोलीत गोवंशीय जनावरांची निर्दयतेने कत्तल केली जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी सुफियान कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही सुभेदार गल्लीत जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल आण्णासाहेब तनपुरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, त्या ठिकाणी चार गोवंशीय जनावरे आणि कत्तलीसाठी लागणारे साहित्य आढळून आले.
​या कारवाईत २० हजार रुपये किमतीची चार जनावरे आणि वजन काट्यासह अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपी सुफियान आयाज कुरेशी हा पोलिसांची चाहुल लागताच घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार एस. बनकर हे करत आहेत. शहरात अवैध कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

हे सुद्धा वाचा :  अवैध माती उत्खननावर महसूलची धडक कारवाई....श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार

लष्करी शाळेसमोरील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
​भिंगार – अहिल्यानगर शहरातील जामखेड रस्त्यावरील लष्करी शाळेसमोरील फॅमिली क्वॉर्टर्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आशिष गणपती गवळी (रा. माधवबाग, आलमगीर रोड, भिंगार) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आशिष हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून अचानक खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर तातडीने त्याचे भाऊ नितेश गवळी यांनी त्याला उपचारासाठी शहरातील साईदीप सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. गेल्या चार दिवसांपासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

​याप्रकरणी रुग्णालयातील डॉक्टर भूषण खर्चे यांनी दिलेल्या माहितीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार आर. एस. मिसाळ यांनी रुग्णालयात धाव घेतली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कासार आणि मिसाळ हे साहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत पोलीस अधिक तपास करत असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया जिल्हा रुग्णालयात पार पडणार आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ