राष्ट्रवादीचे नेते अमोल उगले यांची प्रशासनाकडे मागणी
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात तातडीने शासनमान्य चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पाटचे नेते अमोल उगले यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले.
तालुक्यात हिरवा व वाळलेला चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक मोठे संकटात सापडले आहेत. शेतीपूरक असलेला दुग्ध व्यवसाय हा येथील ग्रामीण कुटुंबांचा प्रमुख आधार आहे. मात्र, चाऱ्याची तीव्र टंचाई, पाण्याची कमतरता आणि बाजारातील वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांना दूरवरून महागडा चारा खरेदी करावा लागत असून, जनावरांचे हाल थांबवण्यासाठी छावण्यांमध्ये पुरेसा चारा आणि पाण्याची सोय करणे अत्यंत गरजेचे आहे. टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील आणि संपूर्ण तालुक्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाने तात्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये भोंद्रे गावचे सरपंच अभिजीत झावरे, वारणवाडीचे सरपंच संजय काशीद, माजी सरपंच अनिल तांबडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक खैरे, निलेश पवार, युवराज पाटील खिलारी, सुरेश झावरे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. आकाश झावरे, पियुष कोकाटे, सचिन वाफारे, मयूर आंधळे, विवेक शिंदे, आणि देसवडे येथील संपत फटांगरे आदींचा समावेश होता. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.










