- जाहिरात -spot_img
breaking news

गारपीट : खासदार लंके शेतकऱ्यांच्या बांधावर, काय म्हणाले पहा…

ढवळपुरी परिसरातील गारपीटग्रस्त भागाची केली पाहणी / नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
पारनेर / नगर सह्याद्री –
ढवळपुरी (ता. पारनेर) परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अचानक झालेल्या अतिवृष्टी आणि भीषण गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी शुक्रवारी सकाळीच बाधीत क्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

​गुरुवार, १९ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ढवळपुरी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस आणि मोठ्या आकाराची गारपीट झाली. यामध्ये कांदा, गहू, हरभरा, आंबा आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत खासदार लंके यांनी शुक्रवारी २० मार्च रोजी सकाळीच ढवळपुरी गाठले. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी खासदारांनी शेतकऱ्यांना धीर धरण्याचे आवाहन केले. नैसर्गिक संकटामुळे झालेली हानी भरून काढणे कठीण असले तरी, शासन आणि वैयक्तिक स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या दौऱ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

​प्रशासनाला तातडीचे आदेश
​शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताना खासदार लंके भावूक झाले. त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी आणि संबंधित महसूल प्रशासनाशी संपर्क साधला. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कागदी घोडे नाचवू नका, तातडीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या, अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून मन व्यथित झाले आहे. हे संकट मोठे आहे, पण आम्ही सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बाधीत शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.
खासदार निलेश लंके

हे सुद्धा वाचा :  पारनेरच्या उपबाजारासाठी जागा देण्यास विरोध; माजी सरपंच शिवाजी खिलारी आक्रमक
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ