- जाहिरात -spot_img
breaking news

वडझिरे रास्ता रोकोप्रकरणी पदाधिकारी, आंदोलनकर्त्यांवर गुन्हे; पोलिसांनी कारण सांगितले…

पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप | दोन तास वाहतूक विस्कळीत

पारनेर | नगर सह्याद्री

वडझिरे येथील कथित अवैध वास्तव्यासंदर्भातील आरोपांच्या पार्श्वभूमीवर देवीभोयरे फाटा येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर आता पारनेर पोलिसांनी आंदोलनातील प्रमुख पदाधिकार्‍यांसह ११ जणांवर आणि अन्य ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वसूचना आणि समज दिल्यानंतरही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर बसून वाहतूक अडविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वडझिरे गावातील काही मदारी समाजातील कुटुंबांच्या वास्तव्यासंदर्भात ग्रामस्थांनी शंका उपस्थित करत पारनेर पोलीस ठाण्याकडे निवेदन दिले होते. या प्रकरणी संबंधित व्यक्तींची आधार कार्ड, मतदान ओळखपत्रे तसेच इतर शासकीय कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी ग्रामस्थांना दिली होती. रस्ता रोको आंदोलन केल्यास सर्वसामान्य नागरिकांना आणि प्रवाशांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे आंदोलन टाळावे, अशा सूचना पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी ग्रामस्थांना दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

१ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पारनेर-अळकुटी मार्गावरील देवीभोयरे फाटा येथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. या आंदोलनात जयसिंग बबन लंके, विवेक वसंतराव मोरे, अर्जुन लंके, शुभम निघुट, राजाराम एरंडे, राजेंद्र मोरे, प्रतिक मोरे, पोपट बबन शेटे, योगेश समाधान तोडकर, पंढरीनाथ मोरे आणि रामदास खोसे यांच्यासह अन्य ३५ ते ४० जणांचा सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळी १०.४० वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी सुमारे १२.५५ वाजेपर्यंत सुरू होते. या कालावधीत पारनेर-अळकुटी मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन थांबविण्यासाठी पोलिसांनी वारंवार सूचना दिल्या, मात्र आंदोलनकर्त्यांनी त्या न मानता आंदोलन सुरूच ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा :  भरता प्रमणे भाऊ अपेक्षित असेल तर स्वतः आधी 'राम' व्हा : रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांचे आवाहन

या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल किरण बापू भापकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या आधारे संबंधितांविरोधात बेकायदेशीर जमाव जमविणे, रस्ता अडवून सार्वजनिक वाहतुकीत अडथळा निर्माण करणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन करणे यासंदर्भातील कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वडझिरे परिसरात कथित घुसखोरी, संशयास्पद कागदपत्रे आणि जमीन व्यवहारांच्या मुद्यावरून सकल हिंदू समाजाच्या वतीने झालेल्या आंदोलनामुळे तालुयातील वातावरण आधीच तापले आहे. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप यांनीही सहभाग घेत एटीएसमार्फत चौकशीची मागणी केली होती. आता रास्ता रोको आंदोलनानंतर गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आले असून, प्रशासनाची पुढील भूमिका आणि चौकशीची दिशा काय राहणार याकडे संपूर्ण पारनेर तालुयाचे लक्ष लागले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ