सोलापूर / नगर सह्याद्री
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील प्रसिद्ध रिलस्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या हॉटेलमध्ये रोहिणीने रील्सच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली होती, त्याच हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेऊन तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेनंतर जवळपास 25 दिवसांनी रोहिणीचा पती निलेश पाराध्ये याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई रोहिणीचे वडिल बाळू शिवशरण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, निलेश पाराध्ये रोहिणीला तिच्या इच्छेविरुद्ध हॉटेलमध्ये काम करण्यास भाग पाडत होता. तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याच त्रासामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यामुळे आता या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

दरम्यान, पोलिसांनी सीडीआर तपासासह प्राथमिक चौकशी केली असता सुरुवातीला ठोस पुरावे हाती लागले नव्हते. मात्र, तक्रारीनंतर या प्रकरणात कारवाई केली आहे. रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणानंतर धक्कादायक माहिती समोर आली होती. तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील महत्वाची माहिती समोर आली.
निलेश पाराध्ये हा रोहिणीचा दुसरा पती आहे. त्याअगोदर तिचे पहिले लग्न झाले होते. मात्र, घटस्फोट झाल्यानंतर तिने निलेशसोबत प्रेमविवाह केला. सुरुवातीला दोघेही पुण्यात राहत होते. त्यानंतर त्यांनी मूळ गावाची वाट धरली आणि तिथेच सरपंच या नाव्याने हॅाटेल व्यवसाय सुरू केला. ज्याला अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, अलीकडच्या काळात हॉटेल व्यवसायाचा विस्तार आणि वाढता कामाचा ताण या कारणामुळे दोघांमधील मतभेद वाढल्याची चर्चा आहे. आता निलेश पाराध्ये याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात कोणती नवी माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असून, रोहिणीच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.










