- जाहिरात -spot_img
breaking news

विखे पाटलांनी चाणक्य नीतीने भेदले राजकीय चक्रव्यूह; पानसरेंचा ‘तो’ हायहोल्टेज ड्रामा स्क्रीप्टेड

तनपुरेंच्या गळ्यात आमदारकीची माळ | जगताप-कर्डिलेंसाठी भविष्यातील धोक्याची घंटा | पानसरेंचा ‘तो’ हायहोल्टेज ड्रामा स्क्रीप्टेड
शिवाजी शिर्के / सारीपाट –
विधान परिषद निवडणूक अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडी वरकरणी दिसल्या, जाणवल्या या पद्धतीत मोडणार्‍या नक्कीच नाहीत. एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणावर स्व. बाळासाहेब विखे पाटलांची मजबूत पकड होती. आज जिल्ह्याच्या राजकारणावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ती पकड अधिक मजबूत करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. अर्थात त्यांच्या या कार्यात त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांची मिळणारी साथ देखील तितकीच महत्त्वाची आहे. विखे पाटलांनी दिलेलं इंजेशन टोचलेल समजत नाही. त्याचा परिणाम उशिराने दिसतो. मात्र समोरच्याला जेव्हा दिसतो तेव्हा वेळ त्याच्या हातून निसटलेली असते. प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड म्हणजे ‘एक तीर दो घायल’ असच म्हणाव लागेल. आगामी लोकसभा निवडणुक डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी सेफ व्हावी आणि जिल्ह्याच्या राजकारणावरील आपली पकड अधिक घट्ट व्हावी यासाठी आपल्या चाणय नेतृत्वातून राजकीय दूरदृष्टी ठेवून विखे पाटलांनी अत्यंत मुरब्बी राजकीय डाव टाकला आहे. दाजी- मेहुणा असणार्‍या आ. संग्राम जगताप व आ. अक्षय कर्डिले यांच्यासाठी ही भविष्यातील राजकारणासाठी धोयाची घंटा ठरल्यास नवल वाटू नये. महायुती विरुद्ध मविआ असा संघर्ष न होता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी बंडखोर असा (औट घटकेचा का होईना) संघर्ष का पाहायला मिळाला आणि त्याचे पडद्याआडचे सुत्रधार कोण हे समजून घेण्याची गरज आहे. कोल्हे, तनपुरे यांना ताकद देत विखे पाटलांना घेरल्याची चर्चा सोयीस्करपणे सोडली गेली असताना प्रत्यक्षात विखे पिता- पुत्रांनी संयमी भूमिका घेत जिल्ह्याच्या राजकारणात आपणच किंगमेकर असल्याचे सिद्ध केले. माघारीच्या एक दिवस आधी आ. संग्राम जगताप यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांचेच दाजी असणार्‍या दत्तात्रय पानसरे यांनी रात्री उशिरापर्यंत जे काही केले आणि त्यात आ. जगताप यांची ज्या पद्धतीने एंट्री झाली ती पाहता अनेकांच्या मनात संशयाचे मळभ निर्माण झाले नसेल तर नवलच! ज्या समाजाच्या विरोधात आ. जगताप जाहीरपणे भाष्य करतात त्याच समाजातून आलेला नगरसेवक पानसरे यांचा सुचक राहिला हे विशेष! विधानसभेच्या राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मोठी डिल झाल्याची चर्चा होती. त्याची परतफेड पानसरे यांच्या उमेदवारीआडून झाली का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळेच पानसरे यांची उमेदवारी दाखल होण्यापासून ते त्याचे रुपांतर हायहोल्टेज ड्रामामध्ये होण्यापर्यंतची त्यांची भूमिका ‘स्क्रीप्टेडटच’ होती यात शंका नाही.

पानसरेंच्या मते संग्राम जगताप हेच मालक अन् जिल्ह्याचे बॉस!
साडेपाच तासांच्या हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा मधील ‘संग्राम जगताप माझे मालक.. जिल्ह्याचे बॉस’ या पानसरेंच्या डायलॉग कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तीन टर्मची आमदारकी, राज्य पातळीवरचा नवहिंदुत्वाचा युवा चेहरा, संधी मिळाली नसली तरी मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असणार्‍या जगताप यांना जिल्ह्याचे पॉलिटिकल बॉस होण्याची राजकीय मनीषा असणे स्वाभाविक आहे. विखे बॉस असताना पानसरे यांनी जगताप हेच बॉस असल्याचे जाहीरपणे सांगितले. विधान परिषदेच्या नथीतून सुजय विखे यांनी वडिलांसाठी अचूक राजकीय तीर मारत जगताप समर्थक एमआयएम नगरसेवक शहबाजला रात्रीतून फोडलं. मुकुंदनगर मध्ये आपली यंत्रणा कामाला लावली. शागिर्द हातावर तुरी देऊन निसटल्याचं जगतापांना लक्षातही येऊ दिल नाही. विखे पाटलांचा माणूस पानसरेंच्या सूचकाला अर्ज माघारी साठी जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन येतो यातच सर्व काही आलं.

हे सुद्धा वाचा :  पाथर्डीतील दरोड्याचा उलगडा; एलसीबीने अवघ्या 48 तासांत 'बदाम गँग'ला ठोकल्या बेड्या

शरद पवार, जयंत पाटील, थोरातांचा प्राजक्तला आशीर्वाद!
महाविकास आघाडीचा उमेदवार रणांगणात असायलाच हवा होता. पुरेसं संख्याबळ नसल तरी विरोधक म्हणून ही त्यांची जबाबदारी होती. मात्र काँग्रेस पक्षाने, तसेच बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला उमेदवारी दाखल करा असे म्हटलेच नसल्याचा धक्कादाय खुलासा अर्ज माघारीच्या वेळी करण ससाणे यांनी केला. राणी लंके यांची उमेदवारी दाखल करण्याच्या केवळ चर्चा घडवून आणल्या गेल्या. प्रत्यक्षात पडद्या मागून राज्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ असणार्‍या जयंत पाटलांनी आपल्या भाच्यासाठी शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना देखील भाच्या विरोधात मविआचा उमेदवारच न देण्यासाठी राजी केल. हे आता उघड झाले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सत्ताधारी व विरोधक हे राजकीय स्वार्थाच्या वेळी एकच आहेत की काय असा नगरच्या जनतेला प्रश्न का पडू नये ?. राजकारणात जनता गेली खड्ड्यात असाच पुढार्‍यांचा विचार असतो. या निवडणुकीत पवार, पाटील, थोरात या त्रिकुटाच्या आशीर्वादातून तनपुरे यांच्या गळ्यात विधान परिषदेची माळ पडली. विधानसभेला पराभव होऊन देखील त्यांच राजकारण पुन्हा जिवंत झाले.

राम शिंदे यांच्याशी दोस्ताना महागात; खा. लंके आता एकाकी
खा. निलेश लंके यांना विधानसभा, त्यानंतर नगरच्या मनपा निवडणुकीत दारुण पराभवाची धूळ चारल्यानंतर विखे पिता – पुत्रांनी आगामी लोकसभेसाठी टाईट फिल्डिंग लावली आहे. नगर दक्षिणेत रोहित पवार वगळता आता सर्व आमदार भाजपचे आहेत. पवार – लंके यांच्यात देखील सख्य नाही. त्याला लंके यांचा राम शिंदे यांच्याशी असणारा दोस्ताना कारणीभूत आहे. त्यामुळे लंके आता पूर्णत: एकाकी पडले आहेत. नगर शहरात त्यांच्या सोबत शिवसेनेचे योगीराज गाडे, विक्रम राठोड हे दोन चेहरे दिसतात. राष्ट्रवादीचा कोणीही नेता दिसत नाही. श्रीगोंदा, कर्जत- जामखेड, पाथर्डी, शेवगाव मध्ये यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. राहुरीत तनपुरेंची साथ होती. मात्र, आता तेच तनपुरे भाजपात दाखल झालेत. येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात नेतृत्व करावे लागणार असताना आज राजकीय फासे पूर्णत: उलटे पडले आहेत. पारनेरमध्ये विखे पाटलांचा एकेरी नामोल्लेख केल्याने विखे पाटलांचे सर्व लक्ष आता पारनेरवर केंद्रीत झाले नसेल तर नवलच!

जिल्हाधिकार्‍यांनी नियम धाब्यावर बसवला!
अर्ज, सूचक, स्वाक्षरी कशावरही माझा आक्षेप नाही, असं पानसरेंनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना रात्री उशिरा लिहून दिलं. त्याचं जिल्हाधिकार्‍यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करून घेतलं. त्यामुळे एमआयएम नगरसेवकान दुपारी तीन वाजण्यापूर्वीच अर्ज माघारीचा दाखल केलेला अर्ज ग्राह्य धरूनच पानसरे यांची तांत्रिक माघार रेकॉर्डवर आहे. त्यामुळे प्रकरण कोणी न्यायालयात नेले तरी जिल्हाधिकार्‍यांनी सेफ गेम खेळला आहे. मुळात न्यायालयात जाणार तरी कोण ? मविआ नेत्यांचीच तनपुरे यांना उघड उघड मदत आहे. यात मात्र विरोधकांकडून जिल्हाधिकार्‍यांवर नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरू ठेवण्याचा आरोप होत आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दल यातून सर्वसामान्य जनतेत मात्र चुकीचा संदेश नक्कीच गेला आहे.

हे सुद्धा वाचा :  पारनेरच्या उत्तर भागात निसर्गाचा कोप ; तुफान वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; बळीराजा पुरता कोलमडला

पानसरेंचा सूचक पळविण्यात विखे पाटलांची भूमिका निर्णायक!
मुकुंद नगर प्रभागातून निवडून आलेला एमआयएमचा नगरसेवक शहबाज अहमद सय्यद हा पूर्वाश्रमीचा जगतापांचा कार्यकर्ता. आ. जगतापांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेनंतर मुस्लिम धार्जिण्या एमआयएमच्या मंचकावर प्रगटलेला शहबाज जगतापांचे सोयरे पानसरे यांच्या अर्जावर सुचक होतो हेच मुळात राजकीय दृष्ट्या खूप सूचक आहे. पण मुकुंदनगरच्या या पठ्ठ्याने राष्ट्रवादीशी दगा फटका केला. विखे समर्थक विनायक देशमुख शहबाज याला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि दालनात जात अर्ज मागे घेतला. याचा राजकीय अर्थ काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सुजय विखेंनी शहबाजला गळाला लावलाच. त्यात ‘अर्थ’पूर्ण घडामोडीं नंतर एमआयएमने भाजपला अर्थपूर्ण मदत केल्याची चर्चा झाली हेही खरे!

चाणाक्षपणे आखल्या जात असलेल्या चक्रव्यूहात ‘अभिमन्यू’!  
स्व. अरुणकाका जगताप, स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर तनपुरे यांना आमदार करत त्यांच्या माध्यमातून अक्षय कर्डिले पर्यायाने आ. जगताप यांच्या वर देखील पॉलिटिकल प्रेशर निर्माण करण्याचा यशस्वी डाव साधला गेला हे नक्की. नगर शहरात देखील विखे पाटील आपली पकड मजबूत करताना दिसत आहेत. प्रभाग दोन मधून ढवण यांच्या उमेदवारीला जगताप यांनी विरोध केला होता. एकमत झालं नाही म्हणून अखेर संपूर्ण शहरात ती जागा अपवाद करत त्यावर राष्ट्रवादी – भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. जगताप यांचा विरोध असताना देखील ढवण निवडून आले. त्यांना विखेंनी भाजपचं गटनेता केल गेलं. विशाल नाकाडे यांना देखील विरोध असतानाही विखेंनी स्वीकृत केलं. सुभाष लोंढे यांची बिनविरोध निवड न होण्यात पडद्याआडून जगताप समर्थकांनी आडकाठी आणली. मात्र, सुजय विखे यांनी लोंढे यांच्यासाठी ताकद लावली. त्याच लोंढे यांना स्थायी समितीचे सभापतीपदही विखे पाटलांनी दिले. एके काळी जगताप विरोधक असणार्‍या धनंजय जाधव यांना उपमहापौरपदी बसवलं. दूरदृष्टी ठेवून विखेंनी आखलेली ही रणनीती बरीच बोलकी असून अत्यंत चाणाक्षपणे चक्रव्यूह आखलं जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

प्राजक्त तनपुरे – अक्षय कर्डिले संघर्ष उफाळणार!
शिवाजीराव कर्डिले हे आज हयात असते तर तनपुरे यांना विधान परिषद कधीच मिळाली नसती. त्यात त्यांनी नक्कीच आडवा पाय घातला असता. विखेंनी देखील तसा मनसुबा आखला नसता. राजकीय उन्हाळे पावसाळे न पाहिलेल्या अक्षय कर्डिले आमदार झाले असले तरी पुन्हा आमदार होण्याच्या मार्गात तनपुरे यांना विधान परिषदेवर पाठवत काटे पेरल्याचे एव्हाना लपून राहिलेले नाही. राहुरी – नगर मतदार संघामध्ये कर्डिलेंवर वजनदार अंकुश निर्माण केला गेला हे नक्की. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. तनपुरे कर्डिलेंच्या कार्यकर्त्यांचे ग्राउंड लेवलवर अजूनही मनोमिलन झालेले नाही. किंबहुना ते होऊ नये अशीच नेतृत्वाची इच्छा दिसते. त्यामुळे आगामी काळामध्ये राहुरी मतदार संघात तनपुरे – कर्डिले संघर्ष उफाळून आलेला दिसल्यास आश्चर्य वाटू नये. या संघर्षाला अंधारातून कोण- कोण खतपाणी घालतील हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.

हे सुद्धा वाचा :  शवविच्छेदनासाठी मागितले पैसे ......संतापजनक घटना कोठे घडली

दुपारच्या रखरखत्या उन्हातील पानसरे उवाच (जसेच्या तसे)!
मी इथून हलणार नाही. हुकुमशाही नाही लोकशाही आहे. प्रत्येक ठिकाणी अन्याय सहन करणार नाही. मला हणायचय – हना, मारायचय – मारा. मी माझ्या आई-वडिलांना स्मरून सांगतो, कुठल्याही माघारीच्या अर्जावर सही केलेली नाही. ती डुप्लिकेट आहे. निवडणूक अधिकार्‍यांनी चुकीच्या पद्धतीने काम केलं असेल तर मी इथ आत्मदहन करणार आहे. हा पणन महासंघाचा राजीनामा. त्यांना लागतोय ना तर घ्या. मला राष्ट्रवादी पक्षांना अर्ज भरण्यास सांगितलेलं नाही. माझा अर्ज वैध झाल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. एक तर माझा अर्ज मंजूर होऊन इथून जाईल, नाही तर माझ धड जाईल. माझं प्रेत जाईल. सांगाडा बनल. त्या स्मशानभूमीतली गाडी येईल आणि मला घेऊन जाईल. आईची शपथ घेऊन सांगतो असं दुपारच्या रखरखत्या उन्हात ओरडून सांगणारे दत्ताभाऊ पानसरे नगरकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता गाडी स्मशानभूमीची गाडी नव्हे तर आ. संग्राम जगताप यांची गाडी आली आणि पानसरेंना घेऊन गेली. ती गाडी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात परत आली. जगतापांबरोबर काळया गाडीतून गेलेले पानसरे काळया अंधारात परतले. मात्र परत आलेले पानसरे वेगळेच होते. दुपारी दुसरेच कोणीतरी पानसरे होते की काय असा प्रश्न सर्वांनाच पडला. तनपुरें समवेत पानसरे यांची एक तास बंद दाराआड चर्चा झाली होती. मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटलांनी सरकारच्या शिष्टमंडळाची नुकतीच केलेली चर्चा माध्यमांसमोर, समाजासमोर लाईव्ह केली. पण निवडणुकीत काळी गाडी, रात्रीचा अंधार, बंद दार या सगळ्याचा काय विशेष ‘अर्थ’ असतो हे न समजण्या इतपत जनता काही दूधखुळी नाही.

तेच पानसरे रात्रीच्या अंधारात (जसेच्या तसे)!
मी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. निवडणूक लढवायची होती. माझे युवा मालक संग्राम दादा (आ. जगताप), नगरसेवक माझ्या पाठीशी होते. मी कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही. पडणार नाही. मी जिथे असतो तिथे प्रामाणिक असतो. युतीच्या सरकारसाठी माघार घेतली, हे सांगताना, पत्रकारांच्या कुणाचा दबाव होता का, या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, माझा दादा (संग्राम) मागच आहे. त्यावेळी बाजूलाच उभ्या असणार्‍या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चेहर्‍यावर जरी स्मित हास्य उमटलेल दिसत असल तरी विखे पाटलांच्या राजकीय डावा पुढे चारी मुंड्या चीत होत माघार घेण्याची नामुष्की पानसरे यांच्या वर, पर्यायाने त्यांच्या ‘बॉस’ वर आली हेच वास्तव आहे. राज्य पणन महासंघाचे पानसरे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. त्यांची राज्य सरकारकडून चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर पानसरेंना यातून आता दिलासा मिळेल अशी चर्चा आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ