दोन दिवसांत समस्या न सुटल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू – नगरसेवक अविनाश घुले
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
प्रभाग क्रमांक १३ मधील शांतिनगर, केदार वस्ती, कोंबडीवाला मळा परिसर, शक्तिनगर, चौधरीनगर, कानडे मळा परिसर, सर्व मंगल कार्यलय परिसर, आशीर्वाद कॉलनी, मोहटादेवी कॉलनी, अरिहंत कॉलनी, विद्यासागर कॉलनी, सावतानगर अशा अनेक भागामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून नागरिकांचा संताप उसळला आहे. दररोज तासनतास नळाजवळ वाट पाहूनही पुरेसे पाणी न मिळाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वरच्या जलकुंभातून पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचे कारण नेहमी देण्यात येत असल्याने लोकांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजी वाढत आहे.
कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे गृहिणींना स्वयंपाक, धुणीभांडी, पिण्याचे पाणी साठवणे अशा मूलभूत गरजा पूर्ण करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही भागांमध्ये तर दिवसाआड पाणी मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. सततच्या निवेदनांनंतरही पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने लोकांमध्ये नाराजी तीव्र झाली आहे.या गंभीर समस्येबाबत नगरसेवक नगरसेवक अविनाश घुले यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक १३ मधील जनता दररोज पाण्यासाठी हाल सोसत आहे.
कमी दाबाने पाणी येत असल्याने अनेक कुटुंबांना पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाले आहे. नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नावर पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. दुर्लक्ष झाल्यास आम्ही नागरिकांसह तीव्र भूमिका घेत आंदोलन उभारू असा प्रशासनाला इशारा दिला. ते म्हणाले, प्रत्येक वेळी ‘वरून पाणी बंद आहे’ हेच कारण सांगून विषय टाळला जात आहे. पाणीपुरवठा तपासणी, पाइपलाइन दुरुस्ती, दाब नियंत्रक प्रणाली याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नाही. नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या भावनांना योग्य न्याय मिळणे आवश्यक आहे.
पालिकेने दोन दिवसांत प्रश्न मार्गी लावला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन छेडणार आहोत. यावेळी नगरसेवक अविनाश घुले, गोरख पडोळे, गणेश उदारे, संतोष बांगर यांनी वसंत टेकडी पाणी टाकी येथील पाहणी केली असता मनपा कर्मचारी या ठिकणी दुरुस्तीचे काम करत होते. मागील तीन दिवसांपासून मोटार बंद होते तर कधी स्टर्टर खराब होतो तर कधी कधी वायरिंग जळाली जाते असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रभाग क्रमांक १३ आणि प्रभाग क्रमांक १४ ला पाणी पुरवठा विस्कळीत होतो. यावेळी अविनाश घुले, सुरेश बनसोडे, अनिता शेटिया, सुजाता पडोळे यांनी सांगितले की जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर मोठे आंदोलन उभारले जाणार आहे.










