राजूर | नगर सह्याद्री-
बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडारदरा परिसरात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. भंडारदरा, घाटघर, पांजरे परिसरात भात अवनीस वेग आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या या निसर्गनगरीला वेढले आणि संततधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अवघा परिसर पुन्हा एकदा हिरवाईने न्हाऊन निघाला असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि पर्यटकांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भात लागवडीसाठी शेतात पुरेसे पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांची रोपे शेतातच सुकू लागली होती. मात्र गेल्या दोन दिवसात भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा चांगला पाऊस सुरु झाल्याने ओढे, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शेतात गुडघाभर पाणी साचले असून, सकाळपासूनच शेतकरी बांधवांनी चिखलात उतरून भात लावणीला सुरुवात केली आहे.

शेतात महिलांच्या भात लावणीच्या गाण्यांनी आणि लगबगीने पुन्हा एकदा शेतीला जिवंतपणा आला आहे. एका अर्थाने हा पाऊस बळीराजासाठी नवसंजीवनी ठरला आहे.मान्सूनचा हा पाऊस पर्यटनासाठी देखील वरदान ठरला आहे. डोंगरदऱ्यांवरून फेसळणारे धबधबे स्वतःला झोकून देत आहेत. सगळीकडे अल्हाददायक वातावरण तयार झाल्याने पर्यटकांच्या आनंदाला मनमोहक रूप धारण केले आहे. धुक्यात हरवलेले कळसूबाई शिखर, हिरवीगार दरी आणि कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गद वाढू लागली आहे. बोटिंग व्यावसायिकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. एकंदरीत, भंडारदऱ्यात बरसलेला हा पाऊस केवळ पाणी नाही तर बळीराजाच्या डोळयातील आश्रू पुसण्याबरोबरच पर्यटकांच्या मनातील मरगळ घालवणारा ठरला आहे. भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढत असून धरण 62 टक्के भरले आहे.










