- जाहिरात -spot_img
breaking news

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला

स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
अहिल्यानगर येथील राज्य वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागामध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, शासनाची तब्बल ३ कोटी ८७ लाख ११ हजार ८५९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शासकीय अधिकार्‍यावर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाचे अधिकारी हेमंत लक्ष्मण गांगे यांनी अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रकाश लक्ष्मण चव्हाण (रा. शृंगार निवास, गुलमोहर रोड, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध शासकीय रकमेचा अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.आरोपी प्रकाश चव्हाण हा अहिल्यानगर कार्यालयात कार्यरत असताना, त्याने आपल्या पदाचा गैरवापर केला. कार्यालयाचे कोणतेही रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवता, संगणक प्रणालीवरील महाविकास सांकेतकांचा वापर करून आपल्या अधिकृत युझर आयडी आणि पासवर्डद्वारे मूल्यवर्धित कर कायद्यांतर्गत तब्बल ४४ चलनांमध्ये व्यापार्‍यांच्या दुरुस्ती अर्जाशिवाय बेकायदेशीर फेरफार केले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर डल्ला मारला.तसेच एका पेट्रोलियम व्यापार्‍याने भरलेला १ लाख ३० हजार ५०२ रुपयांचा कर आरोपीने स्वतःचा मुलगा अक्षय चव्हाण याच्या ‘नक्ष हॉटेल’च्या खात्यावर परस्पर वर्ग करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मुलगीर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

प्रवाशांच्या सतर्कतेमुळे चोरटा गजाआड, एक फरार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जामखेड येथील एका महिला प्रवाशाची पैशांची पर्स आणि मोबाईल हिसकावून पळणार्‍या दोन चोरट्यांपैकी एकाला सहप्रवाशांच्या मदतीने रंगेहात पकडण्यात आले. ही थरारक घटना अहिल्यानगर येथील पुणे बसस्थानकावर घडली. नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून, त्याचा दुसरा साथीदार मुद्देमाल घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

जामखेड येथील रहिवासी रंजना अंकुश तनपुरे या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी संभाजीनगरला जात होत्या. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्या पुणे बसस्थानकावरून संभाजीनगर बसमध्ये बसल्या. यावेळी दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या बॅगची उचकापाचक सुरू केली. रंजना यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केला. चोरट्यांनी बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, रंजना यांनी एका सहप्रवाशाच्या मदतीने एका चोरट्याला जागीच पकडले. मात्र, त्याने झटापट करून बॅग दुसर्‍या साथीदाराकडे फेकली आणि तो साथीदार पळून गेला.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य २ जून २०२६

पकडलेल्या चोरट्याचे नाव वाहीद अब्दुल खान (राफ सराई छबीला, जिल्हा बुलंदशहर, उत्तर प्रदेश) असे आहे. या चोरीमध्ये रंजना यांचे अठरा हजार रुपये रोख आणि पाच हजार रुपयांचा मोबाईल फोन, असा एकूण तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. रंजना यांनी तात्काळ पोलीस मदतीसाठी ११२ क्रमांकावर फोन केला. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी वाहीद खान याला ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पळून गेलेल्या दुसर्‍या आरोपीचा शोध सुरू केला आहे.

केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून वाद
आई आणि मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील केडगाव परिसरात असलेल्या दूधसागर सोसायटीत इन्स्टाग्रामवरील पोस्टवरून मोठा वाद झाल्याची घटना घडली आहे. या वादातून दोन जणांनी एका महिलेला आणि तिच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पहारीने बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दूधसागर सोसायटीत राहणार्‍या एका महिलेच्या मुलाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टचा राग मनात धरून आरोपी ओम संतोष गायकवाड आणि संगीता संतोष गायकवाड (दोघे रा. दूधसागर सोसायटी, केडगाव) यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, दोन्ही आरोपींनी मिळून संबंधित महिलेला थेट जमिनीवर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

आईला मारहाण होत असल्याचे पाहून तिचा तरुण मुलगा तिला सोडवण्यासाठी धावला. मात्र, आरोपींनी त्याच्यावरही हल्ला केला. आरोपींनी त्याच्या डोयात लोखंडी पहार मारून त्याला गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी दोघांनाही अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यात जखमी झालेल्या मायलेकांना उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी ओम गायकवाड आणि संगीता गायकवाड या दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा :  बोगस कर्ज प्रकरण भोवले; वडिलांपाठोपाठ मुलाला अटक, काय घडलं पहा

भिंगार येथील शाळेतील साहित्य लंपास
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भिंगार येथील कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्रीच्या शाळेचे कुलूप तोडून चोरट्याने एकूण १९ हजार ५०० रुपये किमतीचे विविध साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंजुम सगीर शेख यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

भिंगार येथील स्नेहालय संस्थेद्वारे चालवल्या जाणार्‍या ऊर्जा बाल भवन अंतर्गत असलेल्या रात्रीच्या शाळेत ही चोरीची घटना घडली. चोराने शाळेच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कशाच्या तरी साहाय्याने तोडला. चोराने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे आत प्रवेश करून खोलीत ठेवलेले साहित्य चोरून नेले. १० हजार रुपये किमतीचा टीव्ही, ८ हजार रुपये किमतीची ध्वनिक्षेपक यंत्रणा व माईक, स्टील पिंप, कळशी, तीन लोखंडी चौकटींचा समावेश आहे. शाळेचे कुलूप तुटल्याचे आणि साहित्य गायब असल्याचे लक्षात येताच मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या अंजुम सगीर शेख यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मुळगीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला
अहिल्यानगर: पती-पत्नीमधील वादाची चौकशी केल्याचा राग मनात धरून एका नातेवाईकाने महिलेच्या डोयात फरशीचा तुकडा मारून गंभीर दुखापत केल्याची घटना भिंगार येथील वडारवाडी भागात घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडारवाडी परिसरातील पीडित महिला आणि आरोपी नितीन अर्जुन म्हस्के हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी नितीन म्हस्के याने पीडित महिलेला तुझी जाऊ कुठे गेली आहे, अशी विचारणा केली. त्यावर मला याबद्दल काहीही माहिती नाही, असे उत्तर महिलेने दिले. या उत्तराचा राग अनावर झाल्यामुळे आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने परिसरात पडलेला फरशीचा तुकडा उचलून पीडित महिलेच्या डोयावर मारला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपी नितीन अर्जुन म्हस्के याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ