पुणे-पाथर्डी बसमध्ये धाडसी चोरी; प्रवासात महिलेचे साडेबारा लाखांचे दागिने लंपास
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
पुणे ते पाथर्डी प्रवासादरम्यान एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात महिला चोरट्याने वृद्ध महिलेच्या बॅगेतून सुमारे १२ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनाबाई बडाख या पुणे ते अहिल्यानगर असा एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी आपले सोन्याचे दागिने एका बॅगेत सुरक्षित ठेवले होते. मात्र, सकाळी १०:३० ते दुपारी २ वाजेच्या सुमारास बसमध्ये असलेल्या एका अज्ञात महिला चोरट्याने नजर चुकवून बॅगेतील दागिने लंपास केले. यामध्ये अडीच तोळ्याच्या बांगड्या, चार तोळ्याचे दोन मोठे गंठण, मिनी गंठण, कानातील झुबे, टॉप्स, सोन्याच्या सहा अंगठ्या आणि चैन असा एकूण १८ तोळ्यांहून अधिकचा ऐवज चोरीला गेला आहे.
चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अधिक तपास करत असून, बसमधील सीसीटीव्ही चित्रण आणि संशयित महिलांचा शोध घेतला जात आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सिद्धीबागेत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर: शहरातील गजबजलेल्या सिद्धीबाग परिसरात मंगळवारी दुपारी एका तरुणावर लोखंडी कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष अशोक गायके (वय ३५, रा. बुऱ्हाणनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांचा मेहुणा चक्रधर दिलीप दुमाने (वय २१, रा. बोल्हेगाव, मूळ रा. गडचिरोली) हा दुपारी दोनच्या सुमारास सिद्धीबाग परिसरात असताना हा हल्ला झाला. हनुमान लक्ष्मण सूर्यवंशी (रा. रामलिंग मुदगड, ता. निलंगा, जि. लातूर) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अज्ञात कारणावरून झालेल्या या वादात आरोपीने रागाच्या भरात लोखंडी कोयता काढून चक्रधर याच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चक्रधरला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मार्केटयार्ड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तोफखाना पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा नोंदवला असून महिला पोलीस हवालदार गडाख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्रव्यूह रचले असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बनावट इंस्टाग्राम खात्याद्वारे तरुणाची बदनामी; अहिल्यानगर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
अहिल्यानगर: सोशल मीडियाचा गैरवापर करून सर्वसामान्यांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अहिल्यानगर शहरात एका तरुणाच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते उघडून त्याची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रमेश भागचंद शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात खातेधारकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश शिंदे हे खासगी नोकरी करतात. दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून ’24shinde7901630′ या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार केले. या खात्याद्वारे फिर्यादीची समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब लक्षात येताच रमेश शिंदे यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निळकंठ कारखेले करत आहेत. फिर्यादीने आज तक्रार दिल्याने या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, तांत्रिक माहितीच्या आधारे बनावट खाते चालवणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती आणि छायाचित्रे सोशल मीडियावर ठेवताना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे.
रस्ता केल्याच्या कारणावरून एकास लाकडी दांडक्याने मारहाण
अहिल्यानगर: शेतातून रस्ता तयार करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना देहरे परिसरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागदेव बाजीराव पिंपळे (वय ४६, रा. काळे वस्ती, देहरे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, देहरे येथील शेत गट क्रमांक १६/६ मध्ये ही घटना घडली. फिर्यादी पिंपळे हे त्यांच्या मालकीच्या शेतातून रस्ता तयार करण्याचे काम करत होते. यावेळी त्याच परिसरात राहणारा आरोपी जयराम सुरेश आग्रे हा तिथे आला. त्याने पिंपळे यांना ‘तू हा रस्ता बंद कर’ असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.
पिंपळे यांनी ही शेती माझी असून मी रस्ता करणारच असे उत्तर दिल्यावर आरोपीचा राग अनावर झाला. त्याने पिंपळे यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपीने लाकडी दांडक्याने पिंपळे यांच्या हाताच्या कांबीवर जोरात प्रहार केला. तसेच यापुढे रस्ता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली.
मारहाणीत जखमी झालेल्या पिंपळे यांना उपचारासाठी तातडीने पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांनी जयराम आग्रे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार थोरात या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शेतीच्या वादातून झालेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वकील असल्याचे सांगून डॉक्टर तरुणीला मागितली खंडणी
अहिल्यानगर: नोकरीसाठी अर्ज देण्यास आलेल्या एका डॉक्टर तरुणीचा पाठलाग करून, तिचे व तिच्या बहिणीचे खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद चावला असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित डॉक्टर तरुणी सिव्हील हॉस्पिटल येथील सिव्हील सर्जन कार्यालयासमोर दुचाकी पार्किंगमध्ये नोकरीचा अर्ज देण्यासाठी आली होती. यावेळी आरोपी हर्षद चावला याने तिचा पाठलाग केला. पीडितेने विचारणा केली असता, त्याने आपण वकील असल्याचे सांगून राजकीय संबंधांचा बनाव रचला. पीडितेचे आणि तिच्या डॉक्टर बहिणीचे खाजगी व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून ते सार्वजनिक करण्याची धमकी त्याने दिली.
या व्हिडिओच्या बदल्यात आरोपीने दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्याची आणि दोन्ही बहिणींचे वैद्यकीय क्षेत्रातील करिअर संपवून टाकण्याची धमकी त्याने दिली. वारंवार पाठलाग करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हर्षद चावला याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव करत आहेत.










