अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जलजीवन मिशन योजनेतील पाणीयोजनांच्या कामांमध्ये अनियमितता आढळल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे दोन कार्यकारी अभियंता, तीन उपअभियंत्यांसह 6 जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच. बी. चव्हाण, तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता व पुणे जिल्ह्यात बदलून गेलेले वेल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. एस. गडधे, उपअभियंता आर. पी. पिसे, तत्कालीन उपअभियंता पी. आर. संवत्सरकर व तत्कालीन शाखा अभियंता डी. व्ही. परदेशी या 6 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे यांनी तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य पाणी व स्वच्छता मिशन संचालकांनी अहवाल मागवला होता. तो अहवाल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधितांवर निलंबनाची कारवाई व विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अमबोथू श्रीरंगा नायक यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूव जलजीवन मिशनअंतर्गत पाणीयोजनातील गैरव्यवहाराच्या आरोपावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. कार्यकारी अभियंता जी. एस. भोगावडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता एस. आर. वारे, उपअभियंता एस. एस. दहिफळे व तत्कालीन उपअभियंता एम. पी. धगधगे असे माजीप्रा’कडील निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस दहातोंडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर जलजीवन मिशन योजनेतील 830 पाणीयोजनांपैकी 15 योजनांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने 4 ऑगस्ट 2025 रोजी 7 सदस्य समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. या समितीने 7 ऑक्टोबर 2025 रोजी चौकशी अहवाल सादर केला होता. या सर्व 15 योजनांमध्ये अनिमित्त झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
15 योजनांच्या कामांची तपासणी
तपासणी झालेल्या योजना पुढीलप्रमाणे- हनुमान टाकळी पाणीपुरवठा योजना (पाथड), कारेगाव रेट्रोफिटिंग योजना (पाथड), काळेवाडी योजना (पाथड), पत्राचा तांडा योजना (पाथड), हदगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (शेवगाव), मनोरी रेट्रोफिटिंग पाणीपुरवठा योजना (राहुरी), करजगाव रेट्रोफिटिंग योजना (राहुरी), तांदुळवाडी रेट्रोफिटिंग योजना (राहुरी), पिंपळगाव फुंगी रेट्रोफिटिंग योजना (राहुरी), गणेगाव रेट्रोफिटिंग योजना (राहुरी), प्रतापूर रेट्रोफिटिंग योजना (संगमनेर), सांगवी रेट्रोफिटिंग योजना (संगमनेर), उंबरगाव रेट्रोफिटिंग योजना (श्रीरामपूर), निमगाव खैरी रेट्रोफिटिंग योजना (श्रीरामपूर) व गोगलगाव रेट्रोफिटिंग योजना (राहाता).










