खासदार शोभा बच्छाव
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आणि देशात राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनी भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “भाजपचे बोलणे हे लबाडाचे बोलणे आहे. महिला आता सर्व काही ओळखून आहेत. आज महिलांना आरक्षण नको, तर संरक्षण द्या अशी म्हणण्याची वेळ आली आहे,” असे परखड वक्तव्य अहिल्यानगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष दीप चव्हाण, महिला काँग्रेसच्या सदस्य प्रतिभाताई घोगरे, ब्लॉक अध्यक्ष फिरोज खान तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बच्छाव यांनी स्पष्ट केले की, महिला आरक्षणाबाबत काँग्रेसने कधीही विरोधाची भूमिका घेतलेली नाही. उलट 2023 मध्ये केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने ठाम पाठिंबा दिला होता. हे विधेयक संसदेत मंजूर होऊन राष्ट्रपतींचीही मान्यता मिळालेली आहे. मात्र, काँग्रेसने विरोध केला असा खोटा प्रचार भाजपकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की, या विधेयकाच्या अंमलबजावणीपूर्वी देशाची नव्याने जनगणना करणे आणि त्यानंतर मतदारसंघांचे पुनर्रचना (डी-लिमिटेशन) करणे आवश्यक होते. मात्र, भाजप सरकारने 2011 च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघ फेररचनेचे नियोजन केल्याने काँग्रेसने त्यास विरोध दर्शविला. “आधी जनगणना करा, मग आरक्षण लागू करा,” अशी भूमिका राहुल गांधी यांनी यापूर्वीच मांडली होती, असेही त्यांनी नमूद केले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी काँग्रेसने ऐतिहासिक पावले उचलल्याचा दावा करताना त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग काँग्रेसनेच मोकळा केला, तसेच महिलांना राजकारणात नेतृत्वाची संधी दिली, असे त्या म्हणाल्या.
भाजप सरकारवर आरोप करताना त्यांनी जनगणनेच्या निकषांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जम्मू-काश्मीरमध्ये 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जातो, तर आसाममध्ये 2001 च्या आकडेवारीचा वापर केला जातो. “एकाच देशात वेगवेगळे निकष का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच लोकसभेच्या 543 जागा वाढवून 850 करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या “एक कोटी महिलांचे निवेदन राहुल गांधी यांच्या तोंडावर मारणार” या वक्तव्यावरही बच्छाव यांनी संताप व्यक्त केला. “मुख्यमंत्री हे सुशिक्षित आणि अभ्यासू नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राची राजकीय भाषा आणि संस्कृती जपली पाहिजे. अशी भाषा त्यांना शोभणारी नाही,” असे त्या म्हणाल्या.
याचवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत, राज्यातील महिला, शेतकरी, बेरोजगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप अशा वादग्रस्त मुद्द्यांना पुढे करत असल्याचा आरोप केला.










