नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजीनामा दिल्याची माहिती दिली. शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या महिनाभरापासून जंतर मंतरवर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्याचे म्हंटले जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दिल्लीतील या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रासह अनेक राज्यात पसरले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. तसेच गेल्या आठवड्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे केंद्र सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत होती त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी काही वेळा पुर्वी सोशल मिडीयावर पोस्ट करत आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.धर्मेंद्र प्रधान यांनी काही वेळा पुर्वी सोशल मिडीयावर पोस्ट करत आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे.
युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं – शरद पवार
शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडले असे मोठे वक्तव्य केले आहे. युवकांनी संयमाने भावना मांडल्या. युवकांनी भावना देशाच्या नेतृत्वासाठी मांडल्या असंही ते म्हणाले. देशातील लोकशाहीने या निमित्त कात टाकली आहे. तसेच शरद पवारांनी मागण्या ऐका असं मोदींना भेटीत सांगितलं होतं. नव्या पिढीला हाताळताना लाठीमार गरजेचा नव्हता. त्यामुळे हे आंदोलन देशाच्या बाहेरपर्यंत गेलं असंही शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यात त्यांनी नेमकं काय म्हटलंय?
माझ्या तरुण सहकाऱ्यांनो,
मी गेल्या ४ दशकांपेक्षा जास्त काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिलो आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्थाच एका सशक्त राष्ट्राची पायाभरणी असते, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.
मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राष्ट्रसेवा करण्याची जी संधी मला मिळाली, त्याबद्दल मी मा. पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो.
परंतु, ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG च्या परीक्षेत अनियमितता आढळून आली. भारत सरकारने याची तत्काळ दखल घेत तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला, परीक्षा रद्द केली आणि पुनरुपरीक्षेची तारीख घोषित केली. यासोबतच पुढच्या वर्षापासून ही परीक्षा सीबीटी (Computer-based-test) मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कालावधीत २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी, ही आमची मुख्य प्राथमिकता होती. यासाठी ‘संपूर्ण सरकार दृष्टिकोन’ (whole of government approach) ठेवून काम करण्यात आले. यामध्ये भारत सरकारसोबतच राज्य सरकारे, विशेषतः जिल्हा प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी, पालक आणि माता-पित्यांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा पूर्ण झाली.
पहिल्या दिवसापासूनच मी याची जबाबदारी घेतली आणि या परिस्थितीपासून कधीही तोंड लपवले नाही. परीक्षा माफियामुळे आपण कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याची शक्यता खराब होऊ देणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, हा माझा संकल्प होता.
१६ जुलै रोजी घोषित झालेला नीट-यूजीचा (NEET-UG) निकाल समाधानकारक राहिला, ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनाही यश मिळाले. परंतु या कालावधीतही अनेक विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी जबाबदार पदांवर बसलेल्या व्यक्तींनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मन अत्यंत व्यथित झाले.
मी नेहमीच आपल्या लोकशाहीच्या ताकदीवर अढळ विश्वास ठेवणारा राहिलो आहे आणि तरुणांच्या आकांक्षा, स्वप्ने व अपेक्षांचा मनापासून आदर करत आलो आहे. ते केवळ भारताचे भविष्यच नाहीत, तर एका नव्या आणि विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि भविष्याचे शिल्पकारसुद्धा आहेत.
गेल्या १० दिवसांचा घटनाक्रम पाहून माझे मन दुःखी आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही. भारताची युवाशक्तीच या देशाची खरी ताकद आहे. देशाच्या युवाशक्तीला भ्रमाच्या चक्रव्यूहात फसू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे.
जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये, देशाची एकता कायम राहावी, भारतातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये, आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यासात घालवावा आणि करिअर घडवण्यावर भर द्यावा, याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा आदरणीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे.
मी आदरणीय पंतप्रधानांचे मार्गदर्शन, विश्वास आणि सातत्याने मिळालेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच मंत्रिमंडळातील माझे सर्व सन्माननीय सहकारी, मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत मला काम करण्याचे सौभाग्य मिळाले त्या सर्व व्यक्तींचेही आभार मानतो. राष्ट्रसेवा ही माझ्या जीवनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मी यासाठी सदैव समर्पित राहीन.
प्रभू श्री जगन्नाथजींच्या आशीर्वादाने मी भविष्यातही भारतमाता, ओडिशाची जनता आणि देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी स्वतःला समर्पित ठेवीन.
आपला,
धर्मेंद्र प्रधान
अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया समोर
कॅाक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे. गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा मागणीसाठी आंदोलन सुरू होते. अशातच एक मोठी घडामोड घडली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवरुन पोस्ट करत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. ते आता आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त करणार आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यासाठी कॅाक्रोच जनता पार्टीने आंदोलन पुकारलं होतं. ती मागणी मान्य झाल्याचे प्रधान यांच्या राजीनाम्यावरून दिसत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता जंतर मंतर येथे मोठा जल्लोष केला जात आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “हे म्हणत होते या सरकामध्ये राजीनामा होत नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, असे दिपके यांनी म्हटलं आहे. आज पुन्हा एकदा केंद्र सरकारसोबत कॅाक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांसोबत चर्चा होणार होती. मात्र त्या आधीची ही मोठी घडामोड घडली आहे.
आता सुरूवात झालीय… आता मागे हटायचं नाही! प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमेंची पोस्ट
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणामुळे विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. याच पार्श्वभूमीवर CJP (कॉकरोज जनता पार्टी) यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन छेडले.
दिल्लीतील जंतर-मंतरसह मुंबई आणि इतर अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो तरुणांनी सहभाग नोंदवला. जंतर-मंतरवरील आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तेथे उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळाला. CJP आणि विद्यार्थ्यांनी तब्बल २७ दिवस सातत्याने आंदोलन करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आंदोलकांनी या लढ्याला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त केली.
या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही पाठिंबा दर्शवला होता. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली, तर काही कलाकार प्रत्यक्ष आंदोलनातही सहभागी झाले. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सुरुवातीपासूनच नीट पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमे यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत लिहिले, “मेरे युवा साथिंयो! आता सुरूवात झालीय… आता मागे हटायचं नाही! अभिनंदन! #लोकशाही #राजीनामा @CJP_2029.” असं म्हटलं आहे.
हेमंत ढोमेने नीट पेपरफुटी प्रकरण आणि CJPच्या आंदोलनावर सातत्याने भाष्य केले होते. व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला होता.
आंदोलन लगेच संपणार नसल्याची घोषणा
शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा आंदोलनाचा पहिला टप्पा असल्याचे स्पष्ट करत अभिजित दीपके यांनी आंदोलन लगेच संपणार नसल्याची घोषणा केली. “आम्ही राजीनामा मिळाला म्हणून लगेच मैदान सोडणाऱ्यांपैकी नाही. विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांची उकल होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असे सांगत त्यांनी केंद्र सरकारसमोर दोन नव्या आणि कडक मागण्या ठेवल्या आहेत:
आर्थिक मदतीची मागणी: ‘नीट’ परीक्षेतील गोंधळ आणि अन्यायाला कंटाळून ज्या दुर्दैवी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पीडित कुटुंबांना केंद्र सरकारने तातडीने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली पाहिजे.
गुन्हे मागे घेणे व पोलिसांवर कारवाई: २० जुलैनंतर जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते सर्व गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत. तसेच, डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा आणि सचिन शर्मा यांच्यासह लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने केंद्र सरकारला मोठा राजकीय धक्का बसला असला, तरी सीजेपीने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण अजूनही तापलेलेच आहे. जंतर-मंतरवरून पेटलेली ही आंदोलनाची ठिणगी आता संपूर्ण देशात पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, सीजेपीच्या उर्वरित मागण्यांवर आणि विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्ह्यांबाबत केंद्र सरकार आता काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
देवेंद्र फडणवीस नवे शिक्षणमंत्री? बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नव्या शिक्षणमंत्र्याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने तातडीने दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्याचे कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसले, तरी विविध राजकीय चर्चांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असा दावा केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी भाजपचे केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवू शकते, असेही त्यांनी सूचित केले. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या वाढत्या दबावानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीनंतर देशाच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने तातडीने दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर आली आहे.










