सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा परिसरात शनिवारी दुपारच्या दरम्यान वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतातील कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली.
गेली तीन ते चार दिवसांपासून आकाशात ढग भरून येत आहे. शनिवार दि. 23 रोजी दुपारी चार ते सहा दरम्यान सुसाट वारा सुटल्याने भोयरे गांगर्डा येथील भोयरे गांगर्डा-कडूस रस्त्यावरील आप्पासाहेब डोंगरे यांच्या पोल्ट्रीजवळ सुमारे पाच ते सहा पोलवरील विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्या. तारा रस्त्यावर पडल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, प्राथमिक शिक्षक नानासाहेब रसाळ यांनी हा गंभीर प्रकार पाहता तातडीने महावितरणशी संपर्क साधला. तातडीने विद्युत पुरवठा खंडित करण्याची सूचना दिली. रात्री उशिरा महावितरण कर्मचारी आल्यानंतर तारा व विद्युत पोल रस्त्यावरून हटविण्यात आले. त्यानंतर सुमारे पाच तासानंतर वाहतूक सुरळीत चालू झाली.
अचानक आलेल्या वादळामुळे काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले. अनेक झाडे उन्मळून पडली. तर शेतातच झाकलेल्या कांद्यावरील कागद उडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
सुपा जिरायती पट्ट्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या गावरान कांदा काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, कांदा काढल्यावर तो चार ते पाच दिवस शेतातच ठेवला जातो. नंतर तेथेच काटणी केली जाते. चालूवष मात्र मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दुसरीकडे वेळेवर झालेल्या या पावसाने खरिप हंगामपूर्व मशागतींना वेग येणार आहे.
शेतीपंपाच्या विजेचा खेळखंडोबा
गेली तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, सुसाट वेगाने वाहणारे वारे यामुळे गावठाण सिंगल फेज व शेतीपंपाचा विद्युत पुरवठा ठप्प झाला होता. शेतीपंपाच्या विजेचा नेहमीच खेळखंडोबा होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागले. महावितरणच्या वतीने सुपा- बाबुड फिडर व सुपा- कडूस फिडरवरील तारा नव्याने टाकण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.










