माता मळगंगा देवीच्या जयजयकाराच्या घोषणा देत आसमंत दणाणला
निघोज | नगर सह्याद्री –
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या घागरीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.
शुक्रवारी रात्री साधारण ११ वाजता देवीच्या हेमांडपंथी बारवेत श्रींचे दर्शन झाले. त्यानंतर मध्यरात्री मानकर्यांच्या हस्ते या घागरीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी ७ वाजता या घागरीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी माता मळगंगा देवीच्या जयजयकाराच्या घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. यावेळी हेमांडपंथी बारव ते मंदिर आणि पुन्हा हेमांडपंथी बारवेत या घागरीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणूक सुरू असताना ठिकठिकाणी भाविकांनी घागरीवर पुष्पवृष्टी केला. तसेच मळगंगा मंदिर व ग्रामपंचायत चौकात घागरीवर ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. घागर मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर पुजारी म्हणून मान असलेल्या गायखे कुटुंबातील सवाष्णींने घागरीचे औक्षण केले. यावेळी भक्तांनी मळगंगा देवीच्या घोषणा देत जयजयकार केला. फक्त ३०० मीटर अंतर असलेल्या या मिरवणुकीला दोन तास लागले.
शनिवारी देवी दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी चार वाजता छबिण्याची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक कुंडावर गेल्यानंतर तेथील यात्रा सुरू झाली. ही काठी शिखराला लागल्यानंतर कुंडाची यात्रा सुरू होत असते. दोन दिवस ही यात्रा सुरू असते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी खेळणे साहित्य, मिठाईची दुकाने, पाळणे, तसेच शेती साहित्य मोठ्या प्रमाणात मिळतात.
महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करून या यात्रेचा आनंद घेतात. रविवार दि.१२ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कुस्ती हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे. या हगाम्याने या यात्रेची सांगता होत असते. रात्री गावामध्ये किरणकुमार ढवळपुरीकर यांच्या लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.१३ रोजी शहाकादरी बाबांचा उरुस होणार असून मंगळवारी दि.१४ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संघ निघोज व मुंबई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.










