कोपरगाव | नगर सह्याद्री –
येत्या १२ मार्च रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी रात्री उशीरा पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीतून भाजपने अपेक्षेप्रमाणे संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली आहे. उमेदवारांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे या दोघांचा समावेश आहे. विधान परिषदेसाठी पाच उमेदवार देऊन भाजपने निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ३० एप्रिल अशी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने काल ९ जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली. तर विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणार्या पोटनिवडणुकीत भाजपने अपेक्षेनुसार प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळालेले सुनील कर्जतकर हे पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. पक्ष संघटनेत त्यांनी महत्वाची पदे भूषवली आहेत. तर विवेक कोल्हे हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. भाजपने पक्षाच्या सरचिटणीस माधवी नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी आमदार प्रमोद जठार यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या यादीत संजय भेंडे, प्रज्ञा सातव यांच्याही नावाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील आमदारांची संख्या १७ वर
जिल्ह्यात १२ विधानसभा आमदार आहेत. त्याशिवाय नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून संगमनेरचे सत्यजित तांबे प्रतिनिधीत्व करीत आहेत. विधानपरिषदेतून कर्जत-जामखेडचे प्रा. राम शिंदे यांना संधी देण्यात आली. ते सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. पाथर्डीचे शिवाजीराव गर्जे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यानंतर आता कर्जत जामखेडचे सुनील कर्जतकर आणि कोपरगावचे विवेक कोल्हे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यामुळे जिल्हयातील आमदारांची ताकद वाढली असून संख्या १७ वर गेली आहे. हा जिल्ह्याच्या इतिहासातील विक्रम आहे. सर्वाधिक तीन आमदार कर्जत-जामखेड मतदारसंघाला मिळाले त्या खालोखाल संगमनेर, शेवगाव-पाथर्डीत प्रत्येकी दोन आमदार आहेत. आता कोपरगावला दोन आमदार होणार आहेत.










