अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर तालुक्यातील हिवरे झरे येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक २८ मार्च २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थित ग्रामस्थ व पालक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. देशभक्तीपर गीतावर सादर केलेल्या आकर्षक लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. उद्घाटन समारंभानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, समाजप्रबोधनपर, धार्मिक व सांस्कृतिक गीते सादर केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित थीम सॉंग, शेतकरी गीते, गवळण आणि लावणी अशा विविध प्रकारच्या सादरीकरणांचा कार्यक्रमात समावेश होता. विद्यार्थ्यांच्या तालबद्ध आणि शिस्तबद्ध नृत्यप्रकारांनी सर्वांची मने जिंकली. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणावर ग्रामस्थ व पालकांनी बक्षीसांचा वर्षाव केला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुकडी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता मा. श्री बबनराव वाळके यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून हेडगेवार प्रतिष्ठानचे प्राचार्य व सिनेट सदस्य रवींद्र चोभे सर तसेच कॅप्टन राजेश कुमार उपस्थित होते. याशिवाय सरपंच भाऊसाहेब काळे, उपसरपंच रामदास आनंदकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय साळवे, माजी सरपंच सुरेश काटे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
प्रसंगी मुख्याध्यापक रमेश कांडेकर यांनी प्रास्ताविक करत शाळेच्या कार्याची माहिती दिली. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक विकास व्हावा यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिले जाते. तसेच इंग्रजी ज्ञानभाषा म्हणून सेमी-इंग्रजी माध्यमाचा अवलंब केल्यामुळे विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन व लेखन कौशल्य विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य रवींद्र चोभे आणि चिखलीचे सरपंच रामदास झेंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीमती मंगल कोठवळ, सौ. वंदना कडूस तसेच शिक्षक नवनाथ वाळके आणि राजाराम नलगे यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुबक व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत पालक व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने उपस्थित राहिले. नवनाथ वाळके यांच्या बहारदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली. एकूणच, हिवरे झरे जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनाने गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण केले.










