सारसनगरच्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
पतपेढी आणि विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल ८ लाख ७१ हजार ३१६ रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याची घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सारसनगर येथील एका संशयित आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी ऋषभ पारस बोरा (राहणार सारसनगर, अहिल्यानगर) याने तक्रारदारांच्या कुटुंबाचा पूर्ण विश्वास संपादन केला होता. या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने त्यांना विविध योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून तक्रारदारांनी वेळोवेळी आरोपीकडे ८ लाख ७१ हजार ३१६ रुपयांची मोठी रक्कम सोपवली होती.
मात्र, मुदत संपूनही आरोपीने कुठल्याही प्रकारचा परतावा अथवा मुद्दल रक्कम परत न करता चालढकल केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित कुटुंबाने पोलिसांकडे रीतसर अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपी ऋषभ बोरा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार करत असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
आलमगीर येथे तरुणासह वडिलांवर शस्त्राने हल्ला
सात जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भिंगार येथील कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या आलमगीर परिसरातील बिलाल पार्क येथे काल रात्री किरकोळ कारणावरून आणि जुन्या वादातून एका तरुणाला व त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर रज्जाक पठाण यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुजाडीव रईस सय्यद, माजिद रईस सय्यद, सलमान मेहबुब बेलदार, अमन मेहताब खान, शाहरुख शेख ऊर्फ रेवड्या, सर्फराज फय्याद सय्यद ऊर्फ छोटू आणि फैजान गुलाम दस्तगीर यांनी बेकायदेशीर टोळी जमवून फिर्यादीच्या मुलाला विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून वडील समीर पठाण हे जाब विचारण्यासाठी गेले असता, सर्व आरोपींनी संगनमत करून त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपींनी शिवीगाळ व जीवे मारण्याची दमदाटी करत धारदार शस्त्राने वार करून दोघांना गंभीर जखमी केले. या गोंधळात फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी कुठेतरी पडून गहाळ झाली आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या जबाबानुसार कॅम्प पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख पुढील तपास करत आहेत.
सुगंधित तंबाखूवर छापा
अहिल्यानगर:शहरातील महेश टॉकिजच्या पाठीमागे असलेल्या जग्गी ट्रान्सपोर्टच्या पार्किंगमध्ये तोफखाना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली ५२ हजार ५०० रुपये किमतीची सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरलेला ५ लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण ५ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुमित सदाशिव गवळी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून चंदु पान (रा. धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा सर्व प्रतिबंधित माल मानवी आरोग्याला अत्यंत अपायकारक आणि घातक आहे, हे माहीत असूनही आरोपीने तो विक्रीच्या उद्देशाने मागवला होता. जग्गी ट्रान्सपोर्टच्या पार्किंगमध्ये एका पांढर्या रंगाच्या टेम्पोमधून या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात होती. तोफखाना पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा सर्व साठा ताब्यात घेतला.या कारवाईत पोलिसांनी गोण्यांमध्ये भरलेली चौरसिया सुगंधित तंबाखूची तब्बल १ हजार ५०० पाकिटे जप्त केली आहेत.
व्यावसायिकाला मारहाण
अहिल्यानगर:शहरातील मल्हार चौक परिसरात एका फर्निचर व्यावसायिकाला अनोळखी इसमाने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगरकरमळा येथील रहिवासी आणि फर्निचर व्यावसायिक भरत माऊजी पित्रोडा हे पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. स्टेशन रोडवरील मल्हार चौकात आल्यानंतर एका अनोळखी इसमाने त्यांना विनाकारण अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भरत पित्रोडा यांनी या प्रकाराबाबत विचारणा केली असता, त्या इसमाचा राग अनावर झाला. त्याने जमिनीवर पडलेला दगड उचलून पित्रोडा यांच्या कानामागे आणि डोयात जोरात मारला. या हल्ल्यात पित्रोडा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तारकपूर बसस्थानक परिसरात तरुणीचा पाठलाग, अश्लील वक्तव्य
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील तारकपूर बस स्थानक परिसरात एका वीस वर्षीय तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग करत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी ही सावेडी भागातील रहिवासी असून ती शिक्षण घेत आहे. ही घटना रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. पीडिता तिच्या वाहनावरून जात असताना, सिद्धार्थनगर भागातील रहिवासी असलेल्या बंटी उर्फ संकेत ससाणे या आरोपीने स्वतःच्या दुचाकीवरून तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.
संशयित आरोपीने त्याचे वाहन पीडितेच्या वाहनाच्या समांतर आणले. त्यानंतर पीडितेच्या दिशेने अश्लील शब्द वापरून आणि आक्षेपार्ह हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकारानंतर आरोपी आपली दुचाकी वेगाने चालवून घटनास्थळावरून पसार झाला. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे घाबरलेल्या तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली.
या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी संशयित आरोपी बंटी उर्फ संकेत ससाणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तातडीने दखल घेतली असून पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तनवीर शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.










