श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुक्यातील पिसोरेखांड परिसरातील गावडेमळा येथे शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात वृद्ध शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 12 जून) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत विजय पोपट गावडे (रा. गावडेमळा, पिसोरेखांड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपटराव रावजी गावडे (वय 78) यांचा शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले असून आरोपी विलास दादा गावडे याने पोपटराव गावडे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर दुखापत झाल्याने पोपटराव गावडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामन, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच पंचनामा व प्राथमिक तपासाची कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी करून फरार आरोपी विलास गावडे याला अवघ्या काही तासांत अटक करून गजाआड केले. शेतजमिनीच्या किरकोळ वादातून घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात शोककळा पसरली.










