शिवाजी चौक, जुना बाजारतळ येथील अतिक्रमणांवर हातोडा
शेवगाव | नगर सह्याद्री
शहरातील अंतर्गत रस्त्यावरील बाजारपेठेतील अतिक्रमणांवर नगरपरिषदेने हातोडा चालवला. यामध्ये शिवाजी चौक, जुना वरूर रस्ता, जुना बाजारतळ या ठिकाणी अतिक्रमणात असलेल्या दुकाने, टपऱ्या व ओटे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशीही नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी पूर्णवेळ ठाण मांडून मोहीम राबवली. अतिक्रमणे काढण्याची मोहीम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शिवाय शनिवारीही या मोहिमेत सातत्य राखत मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांतील दुकाने व ओटे काढण्यात आले.
सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे शहरातील व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. दुकानदारांनी धास्तावलेल्या अवस्थेत दुकानातील साहित्य इतरत्र हलविले. मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी घेतलेल्या खमक्या भूमिकेमुळे शहरातील वरदहस्त असलेल्या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. अंतर्गत रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला, तरी बाजारपेठ मात्र पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. घाडगे आपल्या चार वर्षांच्या बाळासह उन्हात कारवाईदरम्यान थांबून होत्या.
व्यावसायिकांचे पुनर्वसन होणे गरजेचे
या कारवाईमुळे छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या हातगाडीधारक आणि फेरीवाल्यांवर मोठा आर्थिक परिणाम झाल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अतिक्रमण हटवणे गरजेचे असले, तरी नगरपालिकेने व्यावसायिकांसाठी शहरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारावे, तसेच स्वतंत्र पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.










