- जाहिरात -spot_img
breaking news

बहिणीच्या खूनप्रकरणी भावाला जन्मठेप; नेमकं काय घडलं होत पहा…

श्रीरामपूर | नगर सह्याद्री –
श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर येथे 2019 मध्ये घडलेल्या बहिणीच्या निर्घृण खून प्रकरणात विशेष व सत्र न्यायाधीश-1 श्री. एस. एन. साळवे यांनी आरोपी हुसैन अब्दुल्ला पठाण याला दोषी ठरवत जन्मठेप आणि 15 हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे सात वर्षांपूर्वीच्या गाजलेल्या खून प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागला आहे. सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर 2019 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध सुरुवातीला भारतीय दंड संहितेच्या कलम 307 व 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, जखमी मरीयम दादामियाँ पठाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर या गुन्ह्यात कलम 302 ची भर घालण्यात आली.

प्रकरणातील फिर्यादी शाहीन रमजान पठाण यांच्या तक्रारीनुसार, 24 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास त्या व त्यांची सासू मरीयम पठाण या मिल्लतनगर येथील राहत्या घरी असताना आरोपी हुसैन पठाण तेथे आला. त्याने बहिणीवर जादूटोणा व करणी केल्याचा आरोप करत शिवीगाळ केली आणि सोबत आणलेल्या पिशवीतून कोयता काढून तिच्या डोक्यावर, चेहर्‍यावर व हातावर सपासप वार केले. फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत आरोपीला पकडून ठेवले, तर गंभीर जखमी झालेल्या मरीयम पठाण यांना प्रथम श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात व त्यानंतर पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी.डी.उजे यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.खटल्यादरम्यान सरकार पक्षाने नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे सादर केले. आरोपीने आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला असला तरी न्यायालयाने सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे व साक्षी ग्राह्य धरून त्याचा बचाव अमान्य केला. सुनावणीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने यापूर्वी स्वतःच्या पत्नीचाही खून केला होता आणि त्या गुन्ह्यातील शिक्षा भोगून तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर बहिणीने जादूटोणा करून आपल्या कुटुंबियांचा मृत्यू घडवून आणल्याच्या गैरसमजातून त्याने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हे सुद्धा वाचा :  जिल्ह्यातील दहा जणांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत आरोपी हुसैन अब्दुल्ला पठाण याला दोषी ठरवत जन्मठेप व 15 हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.पी.पी.गटणे, अ‍ॅड. एम.आर नवले आणि अ‍ॅड. एन.आर.कहाणे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच न्यायालयीन कामकाजात पीएसआय घाणे व पोहेका सय्यद यांनी कोर्ट पैरवी म्हणून सहकार्य केले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ