पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील चारणवाडी-काताळवेढा परिसरात पारनेर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत तब्बल 42.500 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती कार असा एकूण 11 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल बाळासाहेब गुंड हा कारवाईपूवच फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
तालुक्यातील चारणवाडी येथील राहुल गुंड याच्या घराच्या पाठीमागील बाजूस उभी असलेल्या आल्टो कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवण्यात आल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. या माहितीनंतर पारनेर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी कोणतीही माहिती बाहेर न जाऊ देता नियोजनबद्ध पद्धतीने चारणवाडी-काताळवेढा परिसरात छापा टाकला.
छाप्यामध्ये संशयित आल्टो कारची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला. पोलिसांनी कारमधून 42.500 किलो गांजा जप्त केला. प्राथमिक तपासात हा गांजा विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत लाखोंमध्ये असल्याने या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी गांजासह कार असा एकूण 11 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.कारवाईदरम्यान मुख्य आरोपी राहुल बाळासाहेब गुंड (रा. चारणवाडी, ता. पारनेर) हा घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच या गांजाचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि तो कोणाकडे विक्रीसाठी नेण्यात येणार होता, याचाही तपास सुरू आहे.
या कारवाईत पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमोल धामणे, कल्याण लगड, गणेश डोंगरे, सारंग वाघ, अभिजित बोरुडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, संतोष खैरे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ आणि दक्षिण विभाग मोबाईल सेलचे राहुल गुंड, नितीन शिंदे यांनी सहभाग घेतला.
अंमली पदार्थ साखळीवर पोलिसांचा फोकस
अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या हालचाली रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण भागात गांजा आणि अन्य अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्रिय केली आहे. पारनेर तालुक्यातील ही कारवाई अंमली पदार्थ तस्करीविरोधातील मोठी मोहीम मानली जात असून, त्यामुळे स्थानिक स्तरावर खळबळ उडाली आहे.










