मुंबई / नगर सह्याद्री –
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अहिल्यानगरची जागा काँग्रेसकडे गेली आहे. श्रीरामपूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे असलेली जागा भाजपच्या वाट्याला आली असून, राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे. उद्या मुंबईत पक्ष प्रवेश सोहळा होणार असून, त्यानंतर 31 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी उमेदवारी अर्ज नेला असून तेही निवडणूक लढविणार असल्याने नगरच्या जागेसाठी तिरंगी लढत होणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचं चित्र समोर आलं आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाविकास आघाडीने 17 पैकी 15 जागांवर एकमत साधल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या प्राथमिक फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र, नांदेड आणि नाशिक या दोन जागांवर अद्यापही पेच कायम असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्यामुळे अंतिम निर्णय पुढील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 8 जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेस चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूर पोटनिवडणुकीची जागा लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला 4 जागा आल्या असून रत्नागिरी, जळगाव आणि परभणी-हिंगोली या मतदारसंघांमध्ये ठाकरे गट उमेदवार देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 3 जागा आल्या असून पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली या मतदारसंघांवर पक्ष दावा करणार आहे.
अहिल्यानगरची जागा भाजपच्या वाट्याला,
महायुतीच्या जागा वाटपात अहिल्यानगरची जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. भाजपला १०, शिवसेनेला ४ तर राष्ट्रवादीला २ जागा देण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर अद्याप निर्णय झालेला नाही.
शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, यवतमाळ, नाशिक, परभणी आणि हिंगोली तर राष्ट्रवादीला पुणे आणि कोकण या जागा मिळाल्या. भाजपला नागपूर, अहिल्यानागर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा-गडचिरोली-चंद्रूपर, भंडारा-गोंदिया, सातारा-सांगली या जागा वाट्याला आल्या आहे.जागा वाटप जाहीर होताच त्यापाठोपाठ उमेदवारही जाहीर होणार आहे . १ जून ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षीय बलाबल
भाजप ः १९९
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ५०
शिवसेना (शिंदे) ः ४८
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) ३५
काँग्रेस ः २९
इतर १००
एकूण ४६१










