
राजूर / नगर सह्याद्री –
अकोले तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने मुळा नदीवरील अंबित पाठोपाठ आता पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
मुळा नदीवरील १९३ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबित धरण तीन दिवसापूर्वी भरले त्यानंतर शुक्रवारी ६०० दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले. या वर्षीच्या पावसाळ्यात अकोल्यातील हे दुसरे धरण भरले आहे. पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा आता राहुरी तालुक्यातील मुळा धरणाकडे झेपावला आहे.

छाया / विलास तुपे
मुळा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर टिकून असल्याने मुळेचा प्रवाह कालपासून वाढला यामुळे पिंपळगाव खांड धरण भरले. धरणातील जलसाठा आता नागरिकांचे आकर्षण बनले आहे. परिसरातील या अथांग जलाशयाचे निसर्ग सौंदर्य याकडे लोक आकर्षित होऊ लागले आहे २६ टीएमसी साठवण क्षमतेचे मुळा धरणाकडे आता मुळा नदी पात्रातून आवक सुरू झाली आहे. दरम्यान मुळा पाणलोटात आज मात्र पावसाचा जोर वाढला आहे. भंडारदरा धरण 30 टक्के च्या पुढे गेले असून 3234 द.ल.घ.फू साठा झाला आहे. निळवंडे धरण 1558 द.ल.घ.फू पाणीसाठा झाला आहे.

मागील २४ तासात घाटघर 86 मिमी, रतनवाडी 40 पांजरे 57 तर भंडारदऱ्यात 60 मिमी असा दमदार पाऊस झाला. भंडारादरा परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.










