अहिल्यानगर मनपा कामगार युनियनचे महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाला निवेदन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्यातील अनेक महानगरपालिका कर्मचार्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन-दोन महिने पगार रखडत असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाने पुढाकार घेऊन राज्यातील महानगरपालिकांना एकत्रित करत तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे सचिव कॉम्रेड उदय भट यांना निवेदन देण्यात आले. याबाबत माहिती देताना युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल व सचिव आनंद वायकर यांनी सांगितले की, महानगरपालिका कर्मचार्यांच्या वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यस्तरावर सामूहिक लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील डफ वर्ग महानगरपालिकांना एल.बी.टी. अनुदान (जी.एस.टी.) वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेक महानगरपालिका तसेच इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कर्मचार्यांचे वेतन व पेन्शन वेळेवर अदा होत नाही. फेब्रुवारी २०२६ चे अनुदान दि. ३० मार्च २०२६ रोजी प्राप्त झाले, तर मार्च २०२६ चे अनुदान अद्यापही संबंधित महानगरपालिकांना मिळालेले नाही. ज्या महानगरपालिकांची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही, अशा ठिकाणी कर्मचार्यांचे वेतन, निवृत्त कर्मचार्यांचे पेन्शन, तसेच इतर थकीत देणी देणे अत्यंत कठीण झाले आहे.
यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांना कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागत आहे.या पार्श्वभूमीवर महासंघाच्या वतीने पुणे येथे राज्यातील महानगरपालिका कामगार-कर्मचार्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या बैठकीत अनुदान वितरणातील विलंब, पगार व पेन्शन प्रश्न, तसेच कर्मचार्यांच्या थकीत देण्यांवर सविस्तर चर्चा व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री यांना महासंघाच्या वतीने निवेदन देऊन शिष्टमंडळास चर्चेसाठी वेळ मिळवून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.










