गॅस टंचाईची भीती; साई प्रसादालय आणि विठ्ठल मंदिर अन्नछत्र सतर्क
शिर्डी / पंढरपूर/ नगर सह्याद्री-
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्त्रायल तणावाचे पडसाद आता महाराष्ट्रातील मोठ्या धार्मिक स्थळांवरही उमटू लागले आहेत. देशात संभाव्य गॅस टंचाईची भीती व्यक्त होत असताना शिर्डी आणि पंढरपूरमधील अन्नछत्र व्यवस्थेवर त्याची छाया पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिर्डीतील साईबाबा संस्थानाचे साई प्रसादालय हे देशातील सर्वात मोठ्या अन्नछत्रांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भाविक येथे प्रसादाचा लाभ घेतात. या प्रसादालयात दररोज सुमारे दीड टन गॅसचा वापर होतो. संभाव्य गॅस टंचाई लक्षात घेऊन संस्थान प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली आहे.
सध्या साई प्रसादालयात सुमारे 20 टन गॅसचा साठा उपलब्ध असून आपत्कालीन परिस्थितीसाठी अतिरिक्त चार दिवसांचा राखीव साठा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने प्रसाद सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दिलासा प्रशासनाने दिला आहे. गरज भासल्यास बुंदी प्रसाद आणि लाडू निर्मितीत काही प्रमाणात काटकसर करण्याचा विचारही संस्थान करत आहे.
दरम्यान, संस्थानच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज सुमारे 200 किलो गॅसची बचत होत असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे संभाव्य संकटातही प्रसाद सेवा सुरळीत सुरू ठेवण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे.
दुसरीकडे पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रात दररोज हजारो भाविकांना मोफत अन्नदान केले जाते. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा अन्नछत्र चालते. या स्वयंपाकासाठी दररोज सुमारे 150 गॅस सिलेंडरची आवश्यकता भासते.
सध्या मंदिर समितीकडे गॅसचा पुरेसा साठा असल्यामुळे अन्नछत्राच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र मध्यपूर्वेतील तणाव दीर्घकाळ कायम राहिल्यास गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गरज भासल्यास पर्यायी इंधनाचा विचार करण्याची तयारी मंदिर प्रशासनाने दर्शवली आहे.
विठुरायाच्या दारी आलेला कोणताही भाविक उपाशी परत जाऊ नये, हीच पंढरपूरच्या अन्नछत्राची परंपरा आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी ही सेवा सुरू ठेवण्याचा मंदिर समितीचा निर्धार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.










